

Who Is Sunetra Pawar
मृणालिनी नानिवडेकर
मुंबई : सुनेत्रा अजित पवार या पती अजितदादांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री होत आहेत. खरे तर राजकीय कुटुंबात जन्मलेल्या सुनेत्रा पवार यांचा विवाह राजकारणातील कुटुंबाशी झाला असला, तरी ही सोयरीक त्यांना प्रत्यक्ष सत्तापदापर्यंत घेऊन जाईल हा त्यांच्या कुंडलीतला योग कोणी कधीही ताडलाही नसेल.
तत्कालीन उस्मानाबाद म्हणजे सध्याच्या धाराशिव जिल्ह्यातील डॉक्टर पद्मसिंह पाटील हे शरद पवार यांचे एकेकाळचे अत्यंत जवळचे सहकारी मित्र आणि राजकीय वारसदार. घरी मुलाप्रमाणे वाढवलेल्या पुतण्या अजितदादांना दोनाचे चार करावेसे वाटले तेव्हा त्याला मातेसमान असलेल्या काकी प्रतिभा पवार यांनी पद्मसिंह पाटील यांची बहीण असलेल्या सुनेत्रा यांची सून म्हणून निवड केली.
लक्ष्मीच्या पावलांनी सुनेत्रा जेव्हा पवार कुटुंबात आल्या तेव्हा अजितदादा पवारांचा राजकारणात नुकताच उदय होत होता. या उदयात पवार कुटुंबाच्या बारामतीवरील विलक्षण पकडीचा हात तर होताच आणि अजितदादांच्या प्रचंड मेहनतीचेही ते फळ होते. शरद पवार राष्ट्रीय राजकारणात गुंतलेले असल्याने तेव्हा बारामतीतील छोटी-मोठी कामे अजितदादांकडे येऊ लागली. ते नेते होऊ शकतात हे स्पष्ट होऊ लागले होते.
दरम्यान, शरद पवार महाराष्ट्राच्या राजकारणात परत आले आणि अजितदादा राजकीय जीवनातील पहिली निवडणूक लढवून खासदार बनले. मात्र, दिल्लीत जीव रमत नाही, असे सांगत त्यांनी मुंबई-महाराष्ट्राचे राजकारण सुरू केले. बारामतीचे ते सातत्याने आमदार झाले.
राजकारणाचा अदमास घेण्यास सुरुवात
या संपूर्ण प्रवासात सुनेत्रा पवार सहधर्मचारिणीची भूमिका निभावत होत्या. पवारांच्या घरातील कोणत्याही सुना त्यावेळी राजकारणात नव्हत्या. वास्तविक शरद पवार यांच्या मातोश्री शारदाबाई पवार या राजकारणातील एक अत्यंत समर्थ कर्तृत्ववान महिला होत्या.
दरम्यान, सुप्रिया सुळे राजकारणात येण्याची चर्चा सुरू झाली आणि त्या वरिष्ठ सभागृहात निवडून गेल्या, तेव्हा लगेचच दादांच्याही धर्मपत्नीने राजकारणाचा अदमास घेण्यास सुरुवात केली असे म्हणतात. त्यावेळी त्या विद्या प्रतिष्ठानचे कामकाज बघू लागल्या आणि त्या आधारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर त्या निवडूनही गेल्या. ही निवड झाल्यानंतर विद्यापीठाच्या प्रत्येक अधिसभेला त्या आवर्जून हजेरी लावत. तसेच स्वतःबरोबर आणलेल्या वहीत प्रत्येक गोष्टीची नोंद घेत. या काळात पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य असलेल्या प्रसेनजित फडणवीस यांनी ‘पुढारी’ला सांगितले की, त्या उत्तम प्रशासक असल्याचे आम्ही ताडले.
सिंचन घोटाळ्याची चौकशी
आता पवारांच्या घरातले राजकारण अत्यंत स्पर्धात्मक होऊ लागले होते. सुप्रिया सुळे या पवारांच्या वारसदार म्हणून समोर येऊ लागल्या होत्या. कुटुंबातली अजितदादांची नाराजी यामुळे बारीक आवाजात चर्चेलाही येत होती. त्यातच भारतीय जनता पक्षासमवेत सत्तास्थापना करण्याचा शब्द देत पवारांनी माघार घेतल्याने दोन्हीकडे बाजू पेटल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अजितदादांच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी आक्रमकपणे सुरू झाली आणि त्यानंतर ते भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्य होणार म्हटल्यावर या चौकशीचा ससेमिरा गुंडाळला गेला, असेही राजकीय वर्तुळात बोलले जाते. मात्र, दिलेला शब्द शरद पवार यांनी न पाळल्याने भारतीय जनता पक्षाचे नेते अस्वस्थ झाले होते आणि त्यातूनच बारामती लोकसभा मतदारसंघात अजितदादा पवार यांनी त्यांच्या पत्नीला सुनेत्रा पवार यांना सुप्रिया यांच्या विरोधात उभे करावे असे सुचवले जात होते.
मात्र, पवार घराण्यात सून म्हणून आलेल्या पाटील घराण्यातील सुनेत्रा आता महाराष्ट्राचे नेतृत्व करायला तयार झाल्या आहेत. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील. गुरुवारी अजितदादा यांच्या पार्थिवाला अग्नी दिला जात होता तेव्हा त्यांच्यासमवेत असलेले राणा जगजित सिंह पाटील हे भाजप नेते आता त्यांचे निकटचे सहकारी असू शकतात, असेही बोलले जाते.
पवार कुटुंबातील राजकीय लढाया
याआधी 2014 च्या निवडणुकीत सुप्रिया सुळे जेव्हा लोकसभा रिंगणात उतरल्या होत्या, तेव्हा एका खासगी चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सुनेत्रा पवार यांनी खरे तर बारामतीची इच्छा मीच निवडणूक लढावी अशी होती, असे उद्गार काढले होते. ते उद्गार अखेर 2024 साली प्रत्यक्षात आले. नणंद-भावजय यांची राजकीय लढाई झाली. त्यात सुप्रिया सुळे जिंकल्या.
पुन्हा बारामतीच्या विधानसभा निवडणुकीत अजितदादा यांचा सख्खा पुतण्या युगेंद्र त्यांच्या विरोधात उभा राहिला. नंतर पवार कुटुंबाने आपासातले मतभेद मिटवले होते. तरीही आधी निर्माण झालेली कटुता कुठेतरी दबक्या आवाजात चर्चेला येत होती. या पार्श्वभूमीवर अजितदादा यांच्या दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण होईल काय ही चर्चा पुढे आली. ही चर्चा पुन्हा एकदा शरद पवार यांना केंद्रस्थानी आणून प्रत्यक्षात येईल अशी चिन्हे दिसू लागली. त्यांच्याकडे निर्णयाचे अधिकार जाण्यापूर्वीच अजितदादा पवार यांच्या गटाने सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करायची हे ठरवून ही व्यूहरचना संपुष्टात आणली. या संपूर्ण प्रक्रियेत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि त्यांच्या राजकीय वारसदार सुप्रिया सुळे यांना विश्वसात घेतले गेले काय, याचे उत्तर अद्याप मिळायचे आहे.