

Gyanvapi Mosque:
नवी दिल्ली : राम जन्मभूमी, मथुरा, आणि ज्ञानवापी ही तीन स्थळेच चर्चेच्या केंद्रस्थानी असावीत. मुस्लिमांनी ही स्थळे स्वेच्छेने सोपवावीत, तसेच हिंदूंनी देखील नव्या मागण्या करणे थांबवाव्यात, सतत दावे केले तर समस्या निर्माण होतील, असा सल्ला देत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) चे माजी प्रादेशिक संचालक के.के. मोहम्मद यांनी सध्या सुरू असलेल्या मंदिर-मशीद वादांमध्ये संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे.
देशभरातील न्यायालयांमध्ये मंदिर-मशीद वादासंबंधी अनेक याचिका प्रलंबित असताना मोहम्मद यांनी केलेले हे वक्तव्य चर्चेत आहे. एका वृत्तवाहिनीसोबत बोलताना मोहम्मद यांनी स्पष्ट केले की राम जन्मभूमी वगळता मथुरा आणि ज्ञानवापी ही दोन अन्य स्थळे हिंदूंसाठी मक्का आणि मदिना मुस्लिमांसाठी जितकी महत्त्वाची आहेत, तितकीच महत्त्वाची आहेत.
अयोध्या वादावर बोलताना मोहम्मद यांनी बी.बी. लाल यांच्या नेतृत्वाखाली 1976 मध्ये बाबरी मशिदीच्या उत्खननात त्यांच्या सहभागाची आठवण सांगितली. एका कम्युनिस्ट इतिहासकाराच्या प्रभावामुळे हा वाद वाढला, असे ते म्हणाले. त्यांच्या मते, या इतिहासकाराने मुस्लिम समुदायाला मशिदीखाली असलेल्या मंदिराच्या पुराव्यांचा स्वीकार करू नये असे सांगितले.
मोहम्मद यांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला बहुतेक मुस्लिम लोक या वादावर तोडगा काढण्यास आणि वादग्रस्त जागेवर मंदिर बांधण्याची परवानगी देण्यास तयार होते. पण, तो इतिहासकार पुरातत्वशास्त्रज्ञ नव्हता आणि त्याने उत्खननाच्या कोणत्याही टप्प्यावर त्या स्थळाला भेट दिली नव्हती. ज्यांनी त्या वेळी जनमतावर प्रभाव टाकला, त्यांच्याकडे प्रत्यक्ष ज्ञानाची कमतरता होती, असे सांगत त्यांनी खोट्या माहितीच्या प्रसारावर टीका केली.
ते म्हणाले, "त्या अत्यंत महत्त्वाच्या वेळी, एका कम्युनिस्ट इतिहासकाराने या सर्व गोष्टींमध्ये हस्तक्षेप केला. नंतर मुस्लिम समुदायाला पटवून दिले की प्रोफेसर लाल यांनी त्या जागेचे उत्खनन केले आणि त्यांना पूर्वी मंदिर असल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाही. त्यामुळे मुस्लिमांकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. त्यांनी उत्खननापूर्वी, उत्खननादरम्यान किंवा उत्खननानंतरही त्या जागेला कधीही भेट दिली नव्हती. त्यामुळे, विषयाची माहिती नसतानाही, ते अशा प्रकारच्या खोट्या माहितीचा प्रचार करत होते. त्यामुळे, कोणीतरी याला उत्तर देणे आवश्यक होते. त्यामुळे, टीमचे नेतृत्व करणाऱ्या प्रोफेसर बी.बी. लाल यांनी पहिल्यांदाच त्याला योग्य उत्तर दिले," असे ते म्हणाले.
मंदिर-मशीद वादांच्या मुद्द्यावर मोहम्मद यांनी सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला. राम जन्मभूमीसह मथुरा आणि ज्ञानवापी ही हिंदू समुदायासाठी महत्त्वाची स्थळे आहेत. त्यांचे महत्त्व मुस्लिमांसाठी मक्का आणि मदिनासारखे आहे. एकतेसाठीचा एकमेव उपाय म्हणजे मुस्लिमांनी स्वेच्छेने ही तिन्ही स्थळे हिंदू समुदायाकडे सोपवावीत, असे ते म्हणाले.
इतर धार्मिक स्थळांशी संबंधित याचिकांवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मोहम्मद म्हणाले, "ही तीन स्थळे वगळता हिंदू समुदायाकडून कोणतीही मागणी करू नये. अतिरिक्त दावे केल्यास समस्येचे निराकरण होणार नाही आणि संघर्षाचा धोका वाढेल, असा इशारा त्यांनी दिला.
सांस्कृतिक वारसा जतनाबद्दल, मोहम्मद म्हणाले की, सरकारकडून, विशेषत: स्थळांच्या संरक्षणाबाबत असलेल्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. सध्याच्या काळ भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे अंधकारमय युग आहे, असे ते म्हणाले.
"भाजप सरकारने सत्ता हाती घेतली तेव्हा आम्हा सर्वांना त्यांच्याकडून खूप अपेक्षा होत्या. त्यामुळे आम्हाला वाटले की सरकारकडून संरक्षण अधिक असेल आणि संस्कृतीत खूप रस घेतील, पण तसे झाले नाही. आम्ही भाजपच्या गेल्या 11 वर्षांच्या काळाला अंधकारमय युग म्हणतो. हे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे अंधकारमय युग आहे."
दरम्यान, एएसआयचे महासंचालक यादुबीर सिंह रावत यांनी या दाव्यांवर आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, "एएसआय खूप काम करत आहे; आमच्याकडे मोठे बजेट आहे, परंतु व्यवस्थापित करण्यासाठी हजारो स्मारके देखील आहेत. काही लोकांनी निवृत्तीनंतर अनेक वर्षांनी गोष्टी सांगितल्या आहेत. ते एएसआयमध्ये असताना त्यांनी हा मुद्दा का उपस्थित केला नाही?" असे म्हणत त्यांनी मोहम्मद यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.