

जयपूर ः भारत-पाकिस्तान सीमेला लागून असलेले राजस्थानातील गंगानगर शहर विदेशी शस्त्रास्त्रांचे लॉजिस्टिक हब (पुरवठा केंद्र) बनत चालल्याचे समोर आले आहे.
पाकिस्तानातील तस्कर दारूगोळ्यासह ते चीन-तुर्कस्तानमध्ये बनवलेली शस्त्रे ड्रोनद्वारे या सीमावर्ती भागांत टाकत आहेत. तेथून ही शस्त्रे देशाच्या इतर भागांमध्ये पोहोचवली जात असून पूर्वी या पट्ट्यातून ड्रग्जचा पुरवठा केला जात होता. या घडामोडींमुळे सीमेवर अधिकाधिक सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या महिन्यात लुधियाना (पंजाब) पोलिसांच्या चकमकीत सापडलेला राजस्थानातील गंगानगर येथील रहिवासी रामलाल हा पाक समर्थित दहशतवादी मॉड्यूलचा भाग होता. यापूर्वी गुजरात एटीएसच्या ताब्यात आलेल्या तीन संशयित दहशतवाद्यांनाही शस्त्रे याच मार्गाने पोहोचवली होती, असे पोलिस तपासात उघड झाले आहे.
लुधियाना येथे पोलिसांनी 20 नोव्हेंबर रोजी चकमकीनंतर रामलाल आणि दीपक या दोन तस्करांना हँड ग्रेनेडसह अटक केली होती. रामलाल हा गंगानगर जिल्ह्यातील लालगड शहरातील ताखरावाली गावचा,तर दीपक ऊर्फ दीपू फाजिल्का अबोहरमधील शेरेवाला गावाचा रहिवासी आहे. पंजाब पोलिसांनी त्यांच्याकडून दोन हँड ग्रेनेड आणि पाच पिस्तूल जप्त केले होते.
ग्रेनेड हल्ल्याची योजना
लुधियाना पोलिसांनी केलेल्या चौकशीत समोर आले की, रामलाल आणि दीपक पाकिस्तानस्थित हँडलर जसवीर ऊर्फ चौधरीच्या संपर्कात होते. त्यानेच सीमेवरून ड्रोनद्वारे ही विध्वंसक शस्त्रे पोहोचवली होती. जसवीरच्या निर्देशानुसार दोघांची ग्रेनेड हल्ला करण्याची योजना होती. पंजाब पोलिसांचे म्हणणे आहे की, दोन्ही आरोपी त्या दहशतवादी मॉड्यूलचा भाग आहेत, ज्याचे संबंध लॉरेन्स गँगशी जोडलेले आहेत.
यामागील महत्त्वाची कारणे
अधिक लांबीची सीमा : सीमेचा मोठा भाग शेतातून आणि कच्च्या भागातून जातो.
कमी लोकसंख्या असलेले क्षेत्र : ड्रोन ड्रॉपचा धोका कमी असतो
पंजाबशी थेट संपर्क : तस्करीचा माल काही तासांत पंजाबमध्ये पोहोचवला जातो
आधीपासून सक्रिय नेटवर्क : तस्करांना नवीन नेटवर्क तयार करण्याची गरज नाही