

petrol diesel price hike Congress on PM Modi
नवी दिल्ली: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका पार पडताच केंद्र सरकारने सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावली आहे. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची वाढ करण्यात आली असून, यावरून काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "निवडणुका संपल्या की मोदींची वसुली सुरू होते," अशा शब्दांत काँग्रेसने सरकारवर टीका करत पंतप्रधानांचा उल्लेख महागाई पुरुष असा केला आहे.
काँग्रेसने म्हटले आहे की, "इन्फ्लेशन मॅन मोदींनी आज पुन्हा एकदा जनतेवर महागाईचा आसूड ओढला आहे. पेट्रोल-डिझेलमध्ये प्रत्येकी ३ रुपयांची, तर सीएनजीमध्ये २ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. निवडणुका संपल्या की मोदींची लूट सुरू होते, हे आता सिद्ध झाले आहे."
शुक्रवारी झालेल्या या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर ९४.७७ रुपयांवरून ९७.७७ रुपयांवर पोहोचले आहेत. तर डिझेलचे दर ८७.६७ रुपयांवरून ९०.६७ रुपये प्रति लिटर झाले आहेत. सीएनजीच्या दरातही २ रुपयांची वाढ झाल्याने वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पश्चिम आशियातील वाढता तणाव, विशेषतः अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीने प्रति बॅरल १०० डॉलर्सचा टप्पा ओलांडला आहे. होरमुझच्या सामुद्रधुनीतील व्यापार मार्गावर आलेल्या संकटामुळे जागतिक ऊर्जा संकट ओढवले असून त्याचे पडसाद भारतीय बाजारात उमटत आहेत.
विरोधी पक्षांनी मात्र या दरवाढीच्या वेळवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणुका असेपर्यंत स्थिर असलेले दर मतदान संपताच कसे वाढतात? असा सवाल विरोधकांनी केला आहे. दरम्यान, केंद्राने देशात इंधनाचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले असले, तरी या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या बजेटचे मात्र पुरते कोलमडले आहे.