Petrol Diesel Import: फक्त एक दिवस बाकी, भारताला रशियन तेलाचा पुरवठा थांबणार; पेट्रोल-डिझेलची टंचाई भासणार?

स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये गेल्या ७५ दिवसांपासून सुरू असलेला तणाव आणि जागतिक तेल पुरवठ्यावर येणारा दबाव पाहता, भारताने रशियन कच्च्या तेलाच्या आयातीसाठी पुन्हा एकदा अमेरिकेशी संपर्क साधला आहे.
Petrol, Diesel and LPG Supply
Petrol, Diesel and LPG SupplyPudhari
Published on
Updated on

Petrol Diesel Import:

नवी दिल्ली: मध्यपूर्वेतील 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'मध्ये गेल्या ७५ दिवसांपासून सुरू असलेला तणाव आणि जागतिक तेल पुरवठ्यावर येणारा दबाव पाहता, भारताने रशियन कच्च्या तेलाच्या आयातीसाठी पुन्हा एकदा अमेरिकेशी संपर्क साधला आहे. रशियन तेलावरील निर्बंधांमधून भारताला मिळालेली विशेष सवलत उद्या, १६ मे रोजी रात्री १२ वाजता संपुष्टात येत आहे. ही मुदत वाढवून मिळावी यासाठी भारताने अमेरिकेशी संपर्क साधला असून, जागतिक बाजारपेठेतील अस्थिरता टाळण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे.

युक्रेन युद्ध आणि अमेरिकेचा दबाव

रशियन तेलावर पूर्णपणे बंदी नसली तरी, युक्रेन युद्धामुळे रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी कमी करावी, यासाठी अमेरिका सातत्याने भारतावर दबाव टाकत आहे. मात्र, २८ फेब्रुवारीपासून मध्यपूर्वेत सुरू झालेल्या संकटामुळे भारताने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. देशाची ऊर्जा सुरक्षा आणि स्थिर पुरवठा ही आपली सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे भारतीय अधिकाऱ्यांनी ठणकावून सांगितले आहे. तेल बाजारपेठेतील अस्थिरतेचे गंभीर आर्थिक परिणाम होऊ शकतात, असा इशाराही भारताने दिला आहे.

Petrol, Diesel and LPG Supply
Petrol Diesel Price Hike | इंधन दरवाढीचा भडका ! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ; सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार?

आयातीत विक्रमी वाढ

सवलतीची मुदत संपण्यापूर्वी भारतीय रिफायनरी कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदीचा वेग प्रचंड वाढवला आहे. 'केप्लर'च्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात आतापर्यंत रशियाकडून कच्च्या तेलाची आयात प्रतिदिन २३ लाख बॅरल या विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. संपूर्ण मे महिन्याचा सरासरी आकडा १९ लाख बॅरल प्रतिदिन राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, कच्च्या तेलाची खरेदी सुरू असली तरी, अमेरिकन निर्बंधांच्या कक्षेत येणारे रशियन LNG कार्गो स्वीकारण्यास भारताने नकार दिला आहे. या निर्णयामुळे रशियाशी संबंधित किमान एक LNG शिपमेंट सध्या सिंगापूरजवळ अडकले आहे.

भारताकडे किती साठा सुरक्षित आहे?

देशात पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण होईल का? या प्रश्नावर केंद्र सरकारने देशवासीयांना दिलासा दिला आहे. सीआयआयच्या वार्षिक व्यापार परिषदेत बोलताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सांगितले की, "भारताकडे सध्या ६९ दिवसांचा एलएनजी साठा उपलब्ध आहे. ४५ दिवसांचा एलपीजी साठा सुरक्षित आहे. तसेच घरगुती पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी एलपीजीचे दैनंदिन उत्पादन ३६,००० टनांवरून ५४,००० टनांपर्यंत वाढवण्यात आले आहे. सध्याच्या साठ्यामुळे तात्काळ पुरवठा खंडित होण्याचा कोणताही धोका नाही. परिस्थितीवर सरकारचे बारीक लक्ष आहे," असे पुरी यांनी म्हटले होते.

Petrol, Diesel and LPG Supply
Indian rupee | ‘रुपया’ सावरणार कसा?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news