

Microdrama
नवी दिल्ली: भारतात मायक्रोड्रामा हा मनोरंजनाचा प्रकार अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात असला, तरी त्याचा प्रेक्षकवर्ग झपाट्याने वाढत आहे. विद्यार्थी, नोकरी करणारे तरुण, गृहिणी आणि युवा प्रेक्षकांमध्ये या लहान आकाराच्या व्हिडिओ किंवा मालिकांची लोकप्रियता वाढत आहे. विशेषतः 18 ते 34 वयोगटातील महिला आणि पुरुष यामध्ये सर्वाधिक रस दाखवत आहेत. पारंपरिक टीव्ही आणि OTT प्लॅटफॉर्मला नवे आव्हान असलेला मायक्रोड्रामा हा प्रकार नक्की काय आहे आणि ते इतके लोकप्रिय का होत आहेत? चला जाणून घेऊया.
मायक्रोड्रामा हे प्रामुख्याने स्मार्टफोनसाठी तयार केले जाते. याचे भाग साधारणपणे एक ते तीन मिनिटांचे असतात आणि ते अनेकदा व्हर्टिकल फॉरमॅटमध्ये चित्रित केले जातात. प्रेक्षकांना आकर्षित करणारी मुख्य गोष्ट म्हणजे यात भावनिक आणि नाट्यमय कथानकांना प्राधान्य दिले जाते. लपवलेली ओळख, प्रेमसंबंध, विश्वासघात, गुप्त संपत्ती, सत्तासंघर्ष, सूड आणि कौटुंबिक संघर्ष यांसारखे विषय या कथांमध्ये दाखवले जातात. त्यामुळे प्रेक्षकांना कमी वेळातही थरारक अनुभव मिळतो. नेहमीच्या टीव्ही शो किंवा ओटीटी मालिकांप्रमाणे तुम्हाला यासाठी स्क्रीनसमोर बराच वेळ बसून राहावे लागत नाही. शिवाय, प्रत्येक भाग अशा वळणावर संपतो जिथे उत्सुकता शिगेला पोहोचते, ज्यामुळे प्रेक्षकांना पुढचा भाग पाहण्याची इच्छा होते.
स्टोरी टीव्हीचे मुख्य विपणन अधिकारी निशांत कुमार यांच्या मते, टियर-1 आणि टियर-2 शहरांतील 20 ते 34 वयोगटातील तरुण हा मायक्रोड्रामांचा मुख्य प्रेक्षकवर्ग आहे. प्रवासादरम्यान, दुपारच्या विश्रांतीत किंवा रात्री सोशल मीडिया स्क्रोल करताना हे प्रेक्षक मोठ्या प्रमाणावर मायक्रोड्रामा पाहतात. दुपारी 1 वाजता, संध्याकाळी आणि रात्री 9 नंतर प्रेक्षकसंख्येत विशेष वाढ दिसून येते. तसेच 34 ते 40 वयोगटातील प्रेक्षक कुटुंबकेंद्रित कथा आणि गरिबीतून श्रीमंतीपर्यंतचा प्रवास दाखवणाऱ्या कथांना पसंती देतात.
कुमार यांच्या म्हणण्यानुसार, मायक्रोड्रामा आणि पारंपरिक टीव्ही किंवा OTT यांच्यातील सर्वात मोठा फरक म्हणजे पाहण्याची पद्धत. टीव्हीवर कुटुंब एकत्रितपणे कार्यक्रम पाहते, तर OTT वैयक्तिक पण तुलनेने निवांत अनुभव देतो. मायक्रोड्रामा मात्र पूर्णपणे वैयक्तिक स्वरूपाचा आहे. प्रेक्षक दिवसातून अनेक वेळा अॅप उघडून काही मिनिटांचे भाग पाहतात.
अंतिम वर्षाची मास कम्युनिकेशनची विद्यार्थिनी महिमा सिंह सांगते की, ती साधारणपणे रात्रीच्या जेवणानंतर मायक्रोड्रामा पाहते. "कमी वेळात मनोरंजन मिळते आणि सध्या बहुतेक कंटेंट मोफत उपलब्ध असल्याने आकर्षण अधिक आहे," असे ती म्हणाली. तथापि, अनेक प्रेक्षकांच्या मते मायक्रोड्रामा चित्रपट किंवा OTT मालिका यांची जागा घेऊ शकत नाहीत. त्यांचा फॉरमॅट, कथाकथनाची गती आणि सादरीकरण वेगळे असल्याने ते सध्या मनोरंजनाच्या अनुभवात भर घालणारे माध्यम म्हणूनच पाहिले जात आहेत.
बीडीओ इंडियाचे संशोधन आणि विश्लेषण विभागाचे प्रमुख हेमंत कौल यांच्या मते, हा फॉरमॅट तुलनेने स्वस्त, जलद आणि वैयक्तिक असल्यामुळे निर्माते अधिक धाडसी प्रयोग करण्यास तयार असतात. त्यामुळे पारंपरिक स्टुडिओ ज्या विषयांना हात घालण्यास घाबरतात, त्या विषयांवर मायक्रोड्रामामध्ये सहजपणे कथा मांडल्या जातात.
उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, 30 ते 40 मिनिटांचा भाग पाहण्यासाठी वेळ नसलेल्या प्रेक्षकांना भावनिक आणि नाट्यमय कथा कमी वेळात अनुभवायच्या असतात. मायक्रोड्रामा हीच गरज पूर्ण करत आहे. तुकटुकी एंटरटेन्मेंट्सच्या संस्थापक अंशिता कुलश्रेष्ठा यांच्या मते, पारंपरिक OTTच्या तुलनेत मायक्रोड्रामामध्ये कथा झटपट पुढे सरकते. भावनिक सुरुवात, वेगवान कथानक आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी मांडणी हे या फॉरमॅटचे वैशिष्ट्य आहे.
रीलसागाचे संस्थापक शुभ बन्सल यांच्या मते, गृहिणी आणि महिलाकेंद्रित कौटुंबिक मनोरंजन पाहणारे प्रेक्षक हा सर्वात मोठा वर्ग आहे. त्यानंतर टियर-2 आणि टियर-3 शहरांतील तरुण, तसेच 30 वर्षांवरील पुरुष आणि महिला प्रेक्षक मायक्रोड्रामांकडे आकर्षित होत आहेत. शॉर्ट व्हिडिओ पाहण्याची सवय असलेले शहरी प्रेक्षकही आता कथानकप्रधान या नव्या फॉरमॅटकडे वळत आहेत.
मायक्रोड्रामांचे अर्थकारणही OTT मालिकांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. शेअरचॅट, मोज आणि क्विक टीव्हीचे सहसंस्थापक आणि मुख्य वित्तीय अधिकारी मनोहर सिंह चारण यांच्या माहितीनुसार, मायक्रोड्रामाच्या निर्मितीसाठी प्रतिमिनिट सुमारे 12 ते 25 हजार रुपये खर्च येतो. यामुळे एका तासाच्या मालिकेचा खर्च साधारण 12 ते 15 लाख रुपयांपर्यंत मर्यादित राहतो. याउलट पारंपरिक OTT मालिकांसाठी अनेक कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागते. त्यामुळे कमी खर्चात जास्त कंटेंट तयार करण्यासाठी मायक्रोड्रामा हा निर्मात्यांसाठीही आकर्षक पर्याय ठरत आहे.
भारतात कुकू टीव्ही, स्टोरी टीव्ही, क्विक टीव्ही, पॉकेट टीव्ही, तडका, हॅमटीव्ही, फटाफट आणि बुलेट यांसारखे अनेक प्लॅटफॉर्म्स आहेत जे प्रेक्षकांना मायक्रो ड्रामाकडे आकर्षित करत आहेत. प्रेक्षकांचा जलद मनोरंजनाकडे असलेला कल यामुळे, मायक्रो ड्रामांनी भारतात आधीच आपले स्थान निर्माण केले आहे. आता हे प्लॅटफॉर्म्स प्रादेशिक भाषांमध्ये स्थानिक कथांची निर्मिती करून आणि विविध प्रकारच्या कथांचे प्रयोग करून आपला विस्तार करण्याची योजना आखत आहेत. एआयने मायक्रो ड्रामा उद्योगावरही प्रभाव टाकायला सुरुवात केली आहे, आणि अनेक जण प्रेक्षकांचे विश्लेषण करण्यासाठी एआयचा वापर करण्यासोबतच कंटेटच्या बाबतीत नवनवीन प्रयोग करत आहेत.