

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वात देश आत्मनिर्भरतेच्या दिशेने मार्गस्थ आहे. परंतु, काही राजकीय पक्ष कलुषित राजकीय हेतूने मोफतची खैरात वाटत सुटले आहेत. अशा पक्षांना धडा शिकवा, असे आवाहन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी केले. दिल्ली महानगर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने आनंद फाउंडेशनच्या वतीने पहाडगंज परिसरात आयोजित दिल्लीकर मराठी बांधवांच्या स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमात माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजप नेते आनंद रेखी प्रामुख्याने उपस्थित होते.
मंत्री कराड म्हणाले की, (Bhagwat Karad) राजधानीत मराठी संस्कृती संवर्धनाचे कार्य दिल्लीकर महाराष्ट्रीयन करीत आहेत. अनेक मराठी नेत्यांनी केंद्रीय राजकारणात त्यांच्या नेतृत्वाचा ठसा उमटवला असला तरी, कायमस्वरुपी दिल्लीत राहणाऱ्या मराठी बांधवांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा ठसा उमटवण्याचे मोलाचे कार्य केले आहे. अशात मराठी मतदार हे सदैव भाजपच्या पाठीशीच उभे राहिले आहेत.
एकीकडे पंतप्रधान देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत, तर दुसरीकडे गेल्या काही वर्षांत दिल्लीच्या राजकारणात उदयाला आलेला एक पक्ष लोकांना अधिक गरीब बनवून त्यांना गरिबीची सवय लावण्याचे कार्य करीत आहे. अशा पक्षांना मराठी बांधवांनीही धडा शिकवला पाहिजे, असे आवाहन कराड यांनी आम आदमी पक्षाचे नाव न घेता केले. ४ डिसेंबरला दिल्ली महानगर पालिकेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा विश्वास दाखवत भाजपला मतदान करण्याचे आवाहन कराड यांनी केले.
राजधानी दिल्लीसह राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हजारो मराठी कुटुंबीय वास्तव्याला आहेत. संस्कृती, परंपरा तसेच भाषा संवर्धनासाठी त्यांचे एकत्रिकरण महत्वाचे आहे. याच अनुषंगाने यापुढे देखील आनंद फाउंडेशनच्या वतीने प्रयत्न केले जाईल, असा विश्वास भाजप नेते आणि फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आनंद रेखी यांनी व्यक्त केला. दिल्लीतील प्रत्येक मराठी बांधवांसाठी धावून जावू, असे आश्वासन देखील यानिमित्ताने रेखी यांनी दिले आहे.
हेही वाचलंत का ?