लखनौ ;पुढारी ऑनलाईन : भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज मूत्यू प्रकरणातील ( Mahant Narendra Giri death case ) संशयित आरोपी आनंद गिरी सध्या चर्चेत आहे. आनंद गिरी हा महंत नरेंद्र गिरी यांचा एकेकाळी लाडका शिष्य होता. तसेच वाघंबरी मठाचा उत्तराधिकारी अशीही त्याची ओळख होती. मात्र मठाच्या कोट्यवधी रुपयांच्या जमीन विक्रीवरुन सुरु झालेला वाद रक्तरंजित संघर्षापर्यंत जावून पोहचला. नरेंद्र गिरी मूत्यू प्रकरणी ( Mahant Narendra Giri death case ) आनंद गिरी याला हरिव्दार पोलिसांनी अटक केली आहे. जाणून घेऊया या प्रकरणातील संशयित आरोपी आनंद गिरी याच्याविषयी….
आनंद गिरी हा मुळाचा राजस्थानमधील भीलवाडा जिल्ह्यातील सरेरी गावातील रहिवासी आहे. त्याचे मूळ नाव अशोक असे होते. तर त्याच्या वडिलांचे नाव रामेश्वर लाल चोटिया असे आहे. चार भावंडांमध्ये तो सर्वात लहान. त्याचे वडील शेती करत. त्याचा एक भाऊ भाजी विक्रीचा व्यवसाय करतो. तर अन्य दोन भाऊ हे सूरतमध्ये व्यवसाय करतात. सरेरी गावात आनंद गिरी याची ओळख 'संत' अशी आहे.
१९९७ मध्ये वयाच्या १२व्या वर्षी तो घरातून पळून हरिव्दारला गेला होता. येथच त्याची महंत नरेंद्र गिरी यांच्याशी भेट झाली. तुला काय हवे आहे., असे महंत नरेंद्र गिरी यांनी त्याला विचारले होते. यावेळी त्यांनी शिक्षण घेणार असल्याचे सांगितले. नरेंद्र गिरी यांनी त्याला दीक्षा दिली हाेती.
आनंद गिरी हा महंत नरेंद्र गिरी यांचा एकेकाळी लाडका शिष्य होता. एका टीव्ही चॅनेलवर आनंद गिरी याचे प्रवचन दाखविण्यात येत असे. त्याच्या कुटुंबीयांनी हे प्रवचन पाहिले आणि आनंद गिरी याला ओळखले. २०१२ मध्ये आनंद गिरी हा महंत नरेंद्र गिरी यांना घेवून आपल्या गावी गेला होता. या गावात नरेंद्र गिरी यांनी त्याला दिक्षा दिली. यावेळी तो अशोकचा आनंद गिरी झाला. मात्र यानंतर काही वर्षांमध्येच नरेंद्र गिरींबरोबर त्याचा वाद सुरु झाला. कारण होते, वाघंबरी मठाच्च्या ३०० वर्षांपूर्वीच्या मालमत्ता. नरेंद्र गिरी यांनी या मठाची ८ एकर जमीन ४० कोटी रुपयांना विकली, तसेच मठाचा सचिवाही हत्या केली, असा आरोप आनंद गिरी याने केला होता. .
नरेंद्र गिरी यांच्यावर त्याचा जमीनवरुन वाद सुरु झाल्यानंतर त्याने हे धर्मयुद्ध असल्याची घोषणा केली होती. यासाठी त्याने फेसबुकचा आधार घेतला 'वुई सपोर्ट स्वामी आनंदगिरी', 'फॅन्स स्वामी आनंदगिरी, या नावांनी त्याचे फेसबुक पेज होते. यावरुन तो नरेंद्र गिरी यांच्यावर आरोप करत होता. नरेंद्र गिरी यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणीही त्याने केली होती. एकदा त्याने आपल्या फेसबुक पेजवर नरेंद्र गिरी यांचा एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये नरेंद्र गिरी हे आपल्या एका शिष्याच्या विवाहत नोटा उडवताना दिसत होते.
गोरीपान कांती, एखाद्या हिरोसारखी हेअरस्टाईल आणि फिटनेस यामुळे आनंद गिरी याच्या व्यक्तिमत्वाची छाप पडत असे. मात्र मागील काही वर्षांपासून आनंद गिरी हा वादाच्या भोवर्यात राहिला आहे. २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियात दोन महिलांची छेड काढल्याचा आरोप त्याच्यावर होता. यावेळी नरेंद्र गिरी यांनीच त्याची पाठराखण केली होती.
याप्रकरणातून त्याची निर्दोष मुक्तता झाली. यासाठी नरेंद्र गिरी यांनी प्रयत्न केल्याची चर्चा यावेळी होती. त्याने मठाच्या नावाखाली श्रीमंत व्यवसायिकांकडून चार कोटी रुपयाची वसुलीही केली असाही आरोप करण्यात आला होता. होती.
आनंद गिरी याला वाघंबरी मठातून झालेली हकालपट्टीचा निर्णय १४ मे २०२१ रोजी घेण्यात आला होता.
एका मंदिराला आलेला दानरुपी रक्कम आनंद गिरी याने आपल्या कुटुंबाला दिल्याचा आरोप नरेंद्र गिरी यांनी केला होता. यानंतर त्याची वाघंबरी मठातून हकालपट्टी करण्यात आली होती.
वाघंबरी मठ जमीनवर आनंद गिरी याच्या नावावर पेट्रोलपंप सुरु करण्याचे नियोजन होते. त्याच्या नावावर जमीनचा करारही झाला होता. त्याचे ना हरकत प्रमाणपत्रही मिळाले होते. या जागेवर पेट्रोलपंप चालणार नाही, हे मला सांगण्यात आले तेव्हा मी हा प्रस्ताव रद्द केला. त्यामुळे आनंद गिरी हा माझ्यावर नाराज झाला, असा खुलासा नरेंद्र गिरी यांनी केला होता.
आनंद गिरी याने आरोप केल्यानंतर नरेंद्र गिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहिले होते. माझ्या जीवाला धोका, असल्याचे त्यांनी म्हटलं होतं.
हरिव्दारहून प्रयागराजला येत आनंद गिरीने नरेंद्र गिरी यांची माफी मागत दोघांमध्ये सुरु असलेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मी नरेंद्र गिरी यांच्यावर केलेले सर्व आरोप मागे घेतो. तसेच सर्वांची माफी मागतो, असा घुमजाव आनंद गिरी याने केला होता.
यावेळी अखाडा परिषदेने याची दखल घेतली. गुरु पोर्णिमेदिवशी आनंद गिरी याने मठात येवून नरेंद्र गिरी यांना भेटणार होता. मात्र अखाडा आणि मठ व्यवस्यापनाने आनंद गिरी याला मठात येवू दिले नाही.
भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे ( Mahant Narendra Giri death case ) सोमवारी आढळून आले होते. अल्लापूर येथील वाघंबरी मठाच्या खोलीत त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता.
नरेंद्र गिरी महाराजांनी लिहिलेली एक चिठ्ठीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. ही चिठ्ठी मृत्युपत्राप्रमाणे लिहिली असून, कोणत्या शिष्याला काय द्यायचे आणि किती द्यायचे, ते यात नमूद आहे. काही शिष्यांच्या व्यवहाराने मी अत्यंत दु:खी आहे, असेही नमूद केले हाेते.
महंत नरेंद्र गिरी यांना ब्लॅकमेल करण्यात येत होते. त्यांच्या एक व्हिडीओची सीडी तयार करण्यात आली होती.
पोलिसांनी मंगळवारी ही सीडीही जप्त केली आहे. समाजवादी पक्षाच्या तत्कालीन सरकारमध्ये राज्यमंत्री असलेला एक नेता याप्रकरणी संशयाच्या भोवर्यात आहे.
विविध राजकीय पक्षांशी संबंधित सहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, महंतांच्या सुरक्षा रक्षकांचीही चौकशी केली जाणार आहे.
आनंद गिरी यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे.
आनंद गिरी याच्याविरुद्ध जॉर्ज टाऊन पोलिस ठाण्यात महंतांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरिव्दार पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
हेही वाचलं का?
व्हिडिओ :