Election Case | 'न्यायाची थट्टा...' म्‍हणत हायकोर्टाने १० वर्षांनी विधानसभा निवडणुकीतील पराभूत उमेदवाराला केले विजयी घोषित!

HC On Election Case | सर्वोच्च न्यायालयाच्या दिरंगाईवर उच्‍च न्‍यायालयाने व्‍यक्‍त केली नाराजी
 HC On Election Case
प्रतिकात्‍मक छायाचित्र. Pudhari
Published on
Updated on

HC On Election Case

चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाने २०१६-२०२१ च्या विधानसभा निवडणुकीसाठी तिरुनेलवेली जिल्ह्यातील 'राधापुरम' मतदारसंघाचे विजयी उमेदवार अप्पावू यांना विजयी घोषित केले आहे. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण प्रदीर्घ काळ प्रलंबित राहिल्यामुळे या निकालाला तब्बल १० वर्षांचा उशीर झाला. याबद्दल तीव्र नाराजी व्‍यक्‍त करताना न्यायमूर्ती जी. जयचंद्रन यांनी स्पष्ट केले की, "जेव्हा न्यायालये 'लोकप्रतिनिधी कायद्या'नुसार खटल्यांचा जलद गतीने निकाल लावत नाहीत, तेव्हा लोकशाही आणि प्रौढ मतदानाच्या मूळ भावनेला तडा जातो."

अवघ्‍या ४९ मतांनी विजय, द्रमुक उमेदवाराची हायकोर्टात धाव

२०१६ च्या निवडणुकीत अण्णाद्रमुक (AIADMK) चे उमेदवार आय.एस. इनबादुरई हे अवघ्या ४९ मतांच्या फरकाने विजयी झाले होते. या निकालाविरोधात द्रमुक (DMK) चे उमेदवार अप्पावू यांनी २०१६ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. अप्पावू यांचा असा युक्तिवाद होता की, त्यांच्या बाजूने पडलेली वैध मते चुकीच्या पद्धतीने बाद करण्यात आली होती. २०३ टपाली मते बाद ठरवण्यात आली होती, कारण त्यावर माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांची स्वाक्षरी होती, जे राजपत्रित अधिकारी नव्हते.

 HC On Election Case
West Bengal Election Results | घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करणार: प. बंगालच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींची घोषणा

सर्वोच्‍च न्‍यायालयाने दिला नव्‍हता स्‍पष्‍ट निकाल

२०१९ मध्ये उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश देऊन सर्व मतांच्या पुनर्मोजणीचे आदेश दिले होते. त्यानुसार ४ ऑक्टोबर २०१९ रोजी उच्च न्यायालयाच्या आवारातच टपाली मते आणि ईव्हीएमची पुनर्मोजणी झाली. मात्र, त्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने या पुनर्मोजणीविरोधातील याचिकेवर सुनावणी घेत निकाल जाहीर करण्यास स्थगिती दिली.हे प्रकरण २०१९ पासून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित राहिले आणि अखेर २१ मे २०२६ रोजी, "आता बराच काळ उलटून गेला आहे आणि विधानसभेची मुदतही संपली आहे," असे म्हणत सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका निकाली काढली. मात्र, मुख्याध्यापक हे टपाली मतांवर स्वाक्षरी करण्यासाठी राजपत्रित अधिकारी मानले जावेत की नाही, यावर सर्वोच्च न्यायालयाने कोणताही स्पष्ट निर्णय दिला नाही.

 HC On Election Case
Falta Election Result |फाल्टाच्या 'पुष्पा'ला मतदारांनी झुकवले! अभिषेक बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात भाजपचा विजय

अखेर द्रमुक उमेदवार अप्पावू ठरले विजयी

उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या रेकॉर्डवरील अहवालांची पाहणी केली असता समोर आले की, त्या २०३ टपाली मतांपैकी अप्पावू यांना १५३ वैध मते मिळाली होती, तर इनबादुरई यांना केवळ १ मत मिळाले होते. या सुधारित आकडेवारीनुसार, अप्पावू हे १०३ मतांच्या फरकाने विजयी झाल्याचे स्पष्ट झाले. मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीच्या वैधतेबाबत न्यायालयाने स्पष्ट केले की, २०१९ मध्येच त्यांनी मुख्याध्यापकांना मतदाराची ओळख प्रमाणित करण्याचा अधिकार असल्याचा निकाल दिला होता आणि सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय फिरवला नाही.

 HC On Election Case
BJP West Bengal victory 2026 |प. बंगालमध्ये भाजपचे निर्विवाद यश; कोलकात्याच्या मुख्य रस्त्यात दडलंय विजयाचं खास 'उत्तर'!

सुप्रीम कोर्टाच्‍या भूमिकेवर हायकोर्टाने नोंदवली नाराजी

सर्वोच्च न्यायालयाच्या या भूमिकेवर मद्रास उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करताना न्यायमूर्ती जी. जयचंद्रन म्‍हटलं की, "माननीय सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण सुमारे सहा वर्षे प्रलंबित ठेवल्यानंतर, केवळ मुदत संपली म्हणून या कायदेशीर प्रश्नाचे उत्तर न देता तो तसाच ठेवून दिला. अत्यंत आदरासह म्हणावेसे वाटते की, सर्वोच्च न्यायालयाने या प्रश्नाचे उत्तर द्यायला हवे होते, कारण कनिष्ठ न्यायालय म्हणून आम्ही यापूर्वीच यावर आमचा निष्कर्ष नोंदवला होता."

 HC On Election Case
Assembly Election Results 2026 | "राजकीय भूकंपाचे धक्के २०२९ पर्यंत जाणवणार!" : ओमर अब्दुल्लांच्या 'त्या' पोस्टने खळबळ

हा प्रकार म्हणजे 'न्यायाची थट्टा'

"दुसऱ्या महायुद्धानंतर स्वातंत्र्य मिळवून लोकशाही स्वीकारणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक असलेल्या भारताची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी न्यायव्यवस्थेने संविधानाच्या इतर घटकांसोबत मिळून काम केले पाहिजे. लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ८६(७) मधील तरतुदींचे पालन न केल्यास लोकशाही धोक्यात येईल. न्यायालयांनी यापूर्वीच्या 'मोहम्मद अकबर' खटल्यातील स्वतःच्याच निरीक्षणांकडे दुर्लक्ष केले, तर मला भीती वाटते की आपला देशही ७५ वर्षांपूर्वी आपल्यासोबतच स्वतंत्र झालेल्या इतर हुकूमशाही देशांच्या मार्गाने जाऊ शकतो." हा प्रकार म्हणजे 'न्यायाची थट्टा' असल्याचे सांगत न्यायमूर्ती जी. जयचंद्रन म्हणाले की, राधापुरम मतदारसंघातील मतदारांना अशा व्यक्तीला आपला लोकप्रतिनिधी म्हणून सहन करावे लागले, जो प्रत्यक्षात निवडूनच आला नव्हता.

राधापुरमचे लोकप्रतिनिधी म्हणून अप्पावू यांचे नाव नोंदवण्याचे निर्देश

या सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने अप्पावू यांना २०१६-२०२१ या काळासाठी राधापुरम मतदारसंघाचे अधिकृत विजयी उमेदवार घोषित केले आहे. न्यायालयाने इनबादुरई यांना अपात्र ठरवले नसले, तरी त्यांना २०१६-२०२१ या कार्यकाळासाठी आमदार म्हणून मिळणारे कोणतेही निवृत्तीवेतन (Pension) किंवा लाभ घेण्यास मनाई केली आहे. तसेच, विधानसभा सचिवालयाला सर्व अधिकृत दप्तरी २०१६-२०२१ या काळातील राधापुरमचे लोकप्रतिनिधी म्हणून अप्पावू यांचे नाव नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news