

long leaves cancelled at ordnance factories
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील सीमेवर तणाव वाढत चालला आहे. त्या अनुशंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील आयुध कारखान्यातील आणि मध्य प्रदेशच्या जबलपूर जिल्ह्यात असलेल्या आयुध कारखाना खमरिया येथील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. देशात संरक्षण तयारीला वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
ऑर्डनन्स फॅक्टरी चंदा यांनी जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, हा आदेश म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (एमआयएल) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्या निर्देशानुसार जारी करण्यात आला आहे.
परिपत्रकात म्हटले आहे की, सर्व प्रकारच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना कुठल्याही विलंबाविना ड्युटीवर रिपोर्ट करणे अनिवार्य आहे.
"सर्व कर्मचाऱ्यांनी या महत्त्वाच्या काळात राष्ट्रीय आवश्यकतांनुसार अखंड उपस्थिती आणि योगदान सुनिश्चित करून कर्तव्यावर हजर राहणे आवश्यक आहे," असे आदेशात म्हटले आहे. अत्यंत आवश्यक परिस्थितीतच सूट दिली जाईल, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
जबलपूर येथील आयुध निर्माण कारखान्यातील (OFK) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची दोन दिवसांपेक्षा अधिक काळाची सुट्टीही शुक्रवारी रद्द करण्यात आली,. OFK चे जनसंपर्क अधिकारी अविनाश शंकर यांनी पीटीआयला याविषयी माहिती दिली.
ते म्हणाले, "या आर्थिक वर्षासाठी आमचे उद्दिष्ट खूप मोठे आहे आणि एप्रिल महिन्यात आम्ही लक्ष्यित उत्पादन साध्य करू शकलो नाही. या परिस्थितीची भरपाई करण्यासाठी, आम्हाला मुख्यालयाकडून सुट्ट्या रद्द करण्याचे निर्देश मिळाले आहेत जेणेकरून आम्ही पुरेसे कर्मचारी आणि देखरेख सुनिश्चित करू शकू."
ओएफकेमध्ये सुमारे ४,००० लोक काम करतात आणि ते भारतीय सशस्त्र दलांना दारूगोळा पुरवठा करणाऱ्या म्युनिशन्स इंडिया लिमिटेड (एमआयएल) च्या सर्वात मोठ्या युनिट्सपैकी एक आहे. कारखान्यात तोफांचे गोळे, बॉम्ब, रॉकेट आणि इतर संरक्षण साहित्य तयार केले जाते.
तज्ज्ञांच्या मते, देशाची संरक्षण उत्पादन साखळी अबाधित राखण्यासाठी आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अशा प्रकारची तयारी महत्त्वाची मानली जाते. उत्पादन लक्ष्ये पूर्ण करणे आणि वेळेवर वितरण सुनिश्चित करण्यासाठी, कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे.