

नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आधी सिंधू पाणीवाटप करार स्थगित करून पाकिस्तानची जल कोंडी केल्यानंतर भारताने आता पाकची आर्थिक कोंडी करण्यासाठी आणखी तीन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार केंद्र सरकारने पाकिस्तानातून सर्वप्रकारच्या आयातीवर बंदी घातली असून, पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांत प्रवेश करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच, पाकिस्तानातून येणार्या टपाल आणि पार्सल सेवेला स्थगिती देण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हे महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे केंद्राने म्हटले आहे.
वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, पाकिस्तानमधून होणार्या सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयातीवर तत्काळ बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानातून भारतात येणार्या सर्व वस्तूंची आयात थांबणार आहे. एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 या कालावधीत भारताची पाकिस्तानला केली जाणारी निर्यात 447.65 दशलक्ष अमेरिकन डॉलर होती. त्याचवेळी पाकिस्तानातून केलेली आयात 0.42 दशलक्ष अमेरिकन डॉलर होती. भारत पाकिस्तानातून बियाणे, खजूर, अंजीर यासारख्या वस्तू आयात करतो. शासकीय आदेशानुसार, या बंदीतील कोणत्याही अपवादासाठी सरकारची पूर्वपरवानगी आवश्यक असणार आहे.
यापूर्वी 2019 मधील पुलवामा हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानी वस्तूंवर 200 टक्के सीमा शुल्क लादले होते. तेव्हापासून पाकिस्तानमधून होणारी आयात सातत्याने कमी होत गेली आहे. 2024-25 आर्थिक वर्षापर्यंत, भारताच्या एकूण आयातीमध्ये पाकिस्तानचा वाटा 0.0001 टक्क्यापेक्षाही कमी आहे.
केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, पाकिस्तानी ध्वज असलेल्या जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. भारतीय जहाजांनीही पाकिस्तानी बंदरांमध्ये प्रवेश करू नये, असे सरकारने स्पष्ट केले आहे. बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाने व्यापारी जहाज बांधणी कायदा, 1958 च्या कलम 411 अंतर्गत हा आदेश जारी केला आहे. ही बंदी तत्काळ प्रभावाने लागू झाली असून, पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील.
मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात म्हटले की, या कायद्याचा उद्देश राष्ट्रीय हितांनुसार, भारतीय सागरी व्यापार विकसित करणे आणि त्याचे संरक्षण करणे हा आहे. आदेशात म्हटले आहे की, जर कोणत्याही विशिष्ट प्रकरणात शिथिलता आवश्यक असेल, तर त्यासाठी सरकारची परवानगी अनिवार्य असेल.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणीवाटप कराराला स्थगिती दिली. अटारी-वाघा सीमा बंद करण्याचा निर्णयही घेतला. सोबतच, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द केले. पाठोपाठ आणखी तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्यामुळे नजीकच्या काळात पाकच्या अर्थव्यवस्थेला सुरुंग लागू शकतो, असे आंतरराष्ट्रीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
भारतातून पाकिस्तानला सोयाबीन, पशुखाद्य, भाजीपाला, लाल मिरची आणि प्लास्टिकच्या विविध वस्तू निर्यात केल्या जात होत्या. सोबतच, पाकिस्तानमधून सुका मेवा, खजूर, सिमेंट, काच आणि सैंधव मीठ यासारख्या वस्तू आयात केल्या जात होत्या. आता आयात-निर्यात पूर्णपणे बंद झाली आहे. भारत बहुतांश क्षेत्रांमध्ये स्वावलंबी बनला असताना, पाकिस्तान आजही अनेक गोष्टींसाठी इतर देशांवर अवलंबून आहे. मात्र, सैंधव मिठाच्या बाबतीत भारत आजही पाकिस्तानवर अवलंबून आहे. सैंधव मिठाचा पुरवठा भारताला पाकिस्तानमधूनच केला जातो.