Rahul Gandhi: राहुल गांधींनी संसदेत मांडला चीन-पाकिस्तानचा मुद्दा, माजी लष्कर प्रमुखांच्या पुस्तकामुळे गोंधळ
Rahul Gandhi Doklam China Controversy: लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी बोलायला उभे राहिले आणि सभागृहात गोंधळ उडाला. राहुल गांधी यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच माजी लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या आत्मचरित्रातील एक संदर्भ दिला. या उल्लेखात डोकलाम आणि चीनचा संदर्भ असल्याने सत्ताधाऱ्यांकडून आक्षेप घेण्यात आला.
राहुल गांधी म्हणाले की, नरवणे यांच्या पुस्तकात डोकलाममध्ये चार चीनी टँक भारताच्या हद्दीत येण्याच्या अगदी जवळ पोहोचले होते, असा उल्लेख आहे. “हे मी बनवून सांगत नाही. जे लिहिलं आहे तेच वाचतोय. यावरून कोण देशभक्त आहे आणि कोण नाही हे समजेल,” असे राहुल गांधी यांनी सांगितले.
मात्र असे बोलताच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उभे राहिले. त्यांनी स्पष्टपणे विचारले की, ज्या पुस्तकाचा उल्लेख केला जात आहे ते पुस्तक प्रकाशित झाले आहे की नाही, हे आधी सांगावे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही राहुल गांधींना नियमांची आठवण करून दिली आणि “ऑथेंटिक पुरावा असेल तरच सदनात मांडावा,” असे सांगितले.
राहुल गांधींनी मात्र हे सर्व शंभर टक्के खरे असून, नरवणे यांच्या पुस्तकात पंतप्रधान आणि संरक्षणमंत्र्यांचा थेट उल्लेख असल्याचा दावा केला. यावर गृहमंत्री अमित शाह यांनी हस्तक्षेप करत सांगितले की, हा उल्लेख कोणत्याही प्रकाशित पुस्तकाचा नाही, तर एका मॅगझिनमधील लेखाचा आहे. “मॅगझिन काहीही छापू शकते. नरवणे यांनी असे विधान केल्याचे आम्हाला माहीत नाही,” असे अमित शाह म्हणाले.
लोकसभा अध्यक्षांनी सांगितले की, सदनात केवळ अधिकृतरीत्या प्रकाशित मजकूर किंवा वृत्तपत्रातील कात्रणच ग्राह्य धरले जाऊ शकते. अप्रकाशित पुस्तकाचा किंवा अप्रमाणित मजकुराचा उल्लेख नियमबाह्य आहे. यानंतर अध्यक्षांनी राहुल गांधींचा माइक बंद करण्याचे निर्देश दिले.
राहुल गांधींच्या सुमारे 46 मिनिटांच्या भाषणात संरक्षणमंत्री, गृहमंत्री, संसदीय कामकाज मंत्री आणि सत्ताधारी पक्षातील खासदारांनी वारंवार आक्षेप घेतले. विरोधकांकडूनही जोरदार प्रतिवाद झाला. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी चीनचा मुद्दा देशाच्या सुरक्षेशी संबंधित असल्याने चर्चा होऊ द्यावी, अशी मागणी केली. मात्र गोंधळ वाढतच गेला. अखेर लोकसभा अध्यक्षांनी सभागृहाची कार्यवाही दुपारी तीन वाजेपर्यंत स्थगित केली.

