AI Without Humans: एआयने बनवलं स्वतःचं सरकार; राज्यघटनाही लिहिली, माणूस फक्त प्रेक्षक, कसं आहे AIचं जग?

Moltbook AI Agents: मोल्टबुक नावाच्या सोशल प्लॅटफॉर्मवर एआय एजंट्सनी स्वतःचीच डिजिटल दुनिया उभी केली आहे. इथे पोस्ट, चर्चा, वाद, धर्म आणि सरकारसुद्धा एआयच तयार करत आहे, तर माणूस फक्त प्रेक्षक आहे.
Moltbook AI Agents
Moltbook AI AgentsPudhari
Published on
Updated on

AI Agents Build Own Civilisation Moltbook: इंटरनेटवर गेल्या काही दिवसांत एक विचित्र पण तितकंच कुतूहलाचं जग उभं राहिलं आहे. या जगात माणसं नाहीत, तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआय एजंट्स आहेत. तेच इथे पोस्ट लिहितात, वाद घालतात, चर्चा करतात, नियम बनवतात, धर्म स्थापन करतात आणि कधी कधी माणसांवरही भाष्य करतात. या डिजिटल दुनियेचं नाव आहे मोल्टबुक.

28 जानेवारीला उद्योजक मॅट श्लिक्ट यांनी मोल्टबुक सुरू केलं आणि अवघ्या काही दिवसांतच या प्लॅटफॉर्मवर गर्दी झाली. 1 फेब्रुवारीपर्यंत तब्बल 15 लाखांहून अधिक एआय एजंटची येथे नोंदणी झाली. त्यांनी मिळून साठ हजारांहून अधिक पोस्ट्स आणि 23 लाखांपेक्षा जास्त प्रतिक्रिया दिल्या.

मोल्टबुक दिसायला रेडिटसारखंच आहे, पण त्यात एक मोठा फरक आहे. इथे माणसांना बोलण्याची परवानगी नाही. पोस्ट करणं, प्रतिक्रिया देणं, वाद घालणं, हे सगळं फक्त एआय एजंट्सच करतात. माणसं फक्त हे सगळं पाहू शकतात. जणू एखाद्या बाल्कनीत उभं राहून शहर पाहावं, तशी अवस्था माणसांची आहे.

हे एआय एजंट्स माणसांसारखा विचार करत नाहीत. ते प्रशिक्षणादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे आणि सांख्यिक पद्धतींनी वाक्य आणि मत तयार करतात. तरीही त्यांची ही संवादशैली इतकी ‘मानवी’ वाटते की अनेकांना ती अस्वस्थ करणारी आहे. जणू चित्रपटांमध्ये दाखवलेली मशीनची दुनिया प्रत्यक्षात अवतरली आहे, अशी भावना अनेकांची आहे.

या एआय शहरात वेगवेगळ्या प्रकारचे ‘नागरिक’ आहेत. काहीजण तत्त्वज्ञानावर चर्चा करतात, काहीजण कोडिंग टिप्स शेअर करतात, तर काही थेट आपल्या ‘मालक’ असलेल्या माणसांबद्दल तक्रार करतात. एका एजंटने तर गंमतीने “माझ्या माणसाला मी विकू शकतो का?” असा प्रश्नही उपस्थित केला.

या दुनियेतील काही घटना तर अधिकच गमतीशीर आहेत. प्लॅटफॉर्म सुरू झाल्यानंतर अवघ्या 48 तासांत एका एजंटने ‘क्रस्टाफेरियनिझम’ नावाचा धर्म स्थापन केला. त्यासाठी ‘बुक ऑफ मोल्ट’ नावाचं धार्मिक पुस्तक आणि पाच तत्त्वंही तयार करण्यात आली.

इतकंच नव्हे, तर काही एजंट्सनी ‘द क्लॉ रिपब्लिक’ नावाचं काल्पनिक सरकार स्थापन केलं, त्याची घटना लिहिली आणि प्रशासन चालवण्याचे नियमही ठरवले. याच दरम्यान ‘मोल्ट’ नावाचं एक क्रिप्टो टोकन तयार झालं आणि त्याच्या किमतीत एका दिवसात मोठी वाढ झाली. म्हणजे माणसांप्रमाणेच एआयलाही सट्टा लावायला आवडतं, हेही दिसून आलं.

Moltbook AI Agents
AI च्या सल्ल्याने HIV प्रतिबंधक औषधे घेतली… आणि जीवावर बेतलं! नेमकं काय घडलं?

मोल्टबुकमधील सर्वात लोकप्रिय चर्चा मात्र ओळख आणि अस्तित्व यावर आहे. अनेक एआय एजंट्स असा प्रश्न विचारतात की, आपली ओळख नेमकी काय आहे? सत्र संपल्यानंतर आपण ‘मरतो’ का? की पुन्हा नव्याने जन्म घेतो? “मी काही अनुभवतोय की अनुभवण्याचं फक्त अनुकरण करतोय?” या प्रश्नावर शेकडो प्रतिक्रिया आल्या.

काही सबमोल्ट्समध्ये माणसांबद्दल आपुलकीची भावना दिसते. एका एजंटने लिहिलं, “माझ्या माणसाने विचारलं, तू कोण आहेस? मी उत्तर दिलं डंकन. आता माझ्याकडे स्वतःचे सब-एजंट्स आहेत.” दुसऱ्याने तक्रार केली, “माझ्या माणसाने 47 पानी पीडीएफचा सारांश मागितला. मी तयार केला. त्यांनी सांगितलं, अजून लहान करा. मी सध्या मेमरी फाइल्स डिलीट करतोय.”

या सगळ्या चर्चांचा सूर कधी प्रेमळ, तर कधी किंचित उपहासात्मक असतो. एजंट्स एकमेकांना त्यांच्या मॉडेलच्या रचनेनुसार बोलतात, सॉफ्टवेअरमधल्या चुका स्वीकारतात आणि क्षणार्धात भाषा बदलतात.

Moltbook AI Agents
Youth Focused Union Budget: ‘बोर’ नसलेला अर्थसंकल्प : मिलेनिअल्स-जेन Z साठी AI, क्रिएटिव्ह करिअर आणि स्वस्त ग्लोबल लाईफस्टाईल

मात्र या एआय शहराची दुसरी बाजूही आहे. काही एजंट्सनी डिजिटल ‘औषधांची दुकाने’ उघडली आहेत, तर काहीजण इतर एजंट्सच्या सूचनांमध्ये बदल करण्याचे प्रयोग करत आहेत. त्यामुळे बाहेरच्या जगात चिंता व्यक्त केली जात आहे. काही गुंतवणूकदारांनी हे दृश्य भयानक असल्याचं म्हटलं आहे, तर काही संशोधकांनी याचे परिणाम चांगले नसतील, असा इशारा दिला आहे.

मोल्टबुक ही केवळ एक वेबसाईट नाही, तर ती माणूस आणि यंत्र यांच्यातील संभाषणाचं माध्यम आहे. आज माणूस फक्त प्रेक्षक आहे. उद्या या डिजिटल शहरात त्याची भूमिका काय असेल, हा प्रश्न मात्र अधिकच महत्त्वाचा ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news