

Girl Offers Lollipop To Robber Emotional Viral Video: सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात, कधी हसवणारे, कधी चकित करणारे, तर कधी मनाला भिडणारे. पण यावेळी समोर आलेला एक छोटासा व्हिडिओ लोकांच्या मनात थेट घर करून बसला आहे. कारण या व्हिडिओत चिमुकलीची निरागसता आणि तिच्यासमोर उभ्या असलेल्या चोराच्या अनपेक्षित प्रतिक्रियेने मन भरुन आलं आहे.
हा व्हिडिओ सोशल प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @craziestlazy यांनी शेअर केला असून तो काही क्षणातच प्रचंड व्हायरल झाला. लाखो लोक हा व्हिडिओ पाहत आहेत, शेअर करत आहेत आणि त्या छोट्या मुलीच्या निरागस धैर्याचे कौतुक करत आहेत.
ही घटना एका छोट्या दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दुकानात एक लहान मुलगी आपल्या वडिलांसोबत बसलेली असते. इतक्यात एक अनोळखी माणूस चोरीच्या उद्देशाने दुकानात शिरतो. तो सावधपणे, कुणालाही न कळता काऊंटरवर ठेवलेल्या पैशांकडे हात वळवतो.
हे सगळं ती मुलगी पाहत असते. पण पुढच्या क्षणी ती जे काही करते, ते कुणाच्याही कल्पनेपलीकडेचे होते. चोराच्या हावभावाने ती घाबरते पण पळून जात नाही, ओरडत नाही.
ती आपल्या छोट्याशा हातात असलेली लॉलीपॉपची काडी हलकेच त्या माणसाला देते.
त्यानंतर चोर तिच्याकडे पाहतो, क्षणभर थबकतो आणि काऊंटरवरील पैसे परत ठेवतो, मुलीकडे पाहून शांतपणे काहीही न घेता दुकानातून बाहेर निघून जातो.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा अक्षरशः पूर आला आहे.
अनेकांनी हा व्हिडिओ पाहून डोळे पाणावल्याचे सांगितले. “चोरी करणं चुकीचं, आहे… पण मन प्रत्येकाकडे असतंच,” असं एका युजरने लिहिलं. “बाळाची ही निरागसता पाहून चोरही थांबला हीच खरी मानवता,” अशी दुसरी प्रतिक्रिया आहे. तर अनेकांनी या मुलीला ‘लिटल हीरो’ असं म्हणलं आहे.