

Karthigai Deepam Controversy : तामिळनाडूतील मदुरै येथील तिरुपरनकुंद्रम टेकडीवर 'कार्तिगई दीपम' उत्सवानिमित्त आज (दि. २४) मोठा तणाव आणि वादाच्या सावटाखाली अखेर दिवा लावण्यात आला. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेल्या 'दीपाथून' या दगडी खांबावर दिवा न लावता, तो उच्छिपिल्लैयार मंदिराच्या वरच्या पारंपरिक ठिकाणी लावण्यात आला. प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे परिसरात मोठा गदारोळ माजला असून, आंदोलक आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे प्रकारही समोर आले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने २० नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशात तिरुपरनकुंद्रम टेकडीच्या माथ्यावर असलेल्या 'दीपाथून' येथे पारंपरिक पद्धतीने तेलाचा दिवा लावण्याची परवानगी दिली होती. असे असतानाही मंदिर प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाने दीपाथूनऐवजी उच्छिपिल्लैयार मंदिरावर दिवा लावण्याचा निर्णय घेतला. सुब्रमण्यम स्वामी मंदिराच्या पुजाऱ्यांच्या एका छोट्या गटाने हा विधी पार पाडला.
या निर्णयाचे तीव्र पडसाद उमटले असून हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला. उत्सव सुरू होण्यापूर्वीच टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या प्रवेशद्वारावर भाविक आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून दीपाथूनवरच दिवा लावला जावा, अशी मागणी करत आंदोलकांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी आंदोलकांना बळाचा वापर करून ताब्यात घेतले. या झटापटीत काही ठिकाणी गोंधळ उडाला, मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या भागात आधीच कडक निर्बंध लागू केले होते. तमिळनाडूच्या विविध भागांतून मदुरैकडे येणाऱ्या अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत ताब्यात घेतले. संपूर्ण टेकडीला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते आणि वर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केली जात होती.
या सर्व घडामोडीनंतर मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुरै खंडपीठाने या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. तमिळनाडू सरकार, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त आणि मंदिर प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या २० नोव्हेंबरच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. टेकडीच्या माथ्यावर दीपाथून येथे पारंपरिक पद्धतीने दिवा लावण्यास परवानगी द्यावी, असे न्यायालयाने बजावले. तसेच, मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी बेकायदेशीररीत्या ताब्यात घेतलेल्या सर्व आंदोलकांची तात्काळ सुटका करण्याचे आदेशही खंडपीठाने दिले.
तिरुपरनकुंद्रम टेकडीवर दिवा लावण्यावरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. टेकडीच्या वरच्या भागात 'दीपाथून' नावाचा एक प्राचीन दगडी खांब असून, तिथेच दरवर्षी कार्तिगई दीपम लावण्याची आपली जुनी परंपरा असल्याचा दावा हिंदुत्ववादी संघटना आणि भाविकांनी केला आहे. या टेकडीच्या पायथ्याशी सुब्रमण्यम स्वामी मंदिर, मध्यभागी शिवमंदिर आणि शिखराजवळ एक दर्गा आहे. त्यामुळे या संवेदनशील परिसरात दीपाथूनवर दिवा लावण्यास प्रशासन आणि इतर गटांकडून सुरक्षा तसेच अन्य कारण पुढे करत विरोध केला जातो.