

Senior Citizens Act : "ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या स्वतःच्या घरात त्याच्या इच्छेविरुद्ध मुलांसोबत राहण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही," असा निकाल दिल्ली उच्च न्यायालयाने दिला आहे. याच निकालात ८५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा छळ आणि गैरवर्तणूक करण्याचा आरोप असणाऱ्या मुलगा आणि सुनेला चार आठवड्यांच्या आत वडिलांनी स्वतःच्या कमाईतून घेतलेले घर रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत.
'पीटीआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, संबंधित ज्येष्ठ नागरिकाने 'पालक आणि ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायदा, २००७' अंतर्गत जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे दाद मागितली होती. मोठ्या मुलाने आणि सुनेने घर रिकामे करावे, तसेच आपल्याला देखभाल खर्च मिळावा, अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र, गैरवर्तणूक आणि छळाचे आरोप सिद्ध झाले नसल्याचे सांगत जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी ही तक्रार निकाली काढली होती.
मुलांमधील व्यावसायिक वाद मिटवण्यासाठी याचिकाकर्ता ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण कायद्याचा गैरवापर करत असल्याचे निरीक्षणही दंडाधिकाऱ्यांनी नोंदवले होते. या निर्णयाविरोधात ज्येष्ठ नागरिकाने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेत नमूद करण्यात आले होते की, २००८ मध्ये धाकट्या मुलाचा विवाह झाला. यानंतर त्यांनी मोठ्या मुलाला आणि सुनेला राहण्याची पर्यायी व्यवस्था करण्यास सांगितले होते. मात्र, त्यांनी घर सोडण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांच्या वागणुकीत बदल झाला. त्यांनी आर्थिक मदत करणेही बंद केले. २०२० मध्ये पत्नीच्या निधनानंतर हा छळ आणि गैरवर्तन अधिकच वाढल्याचेही याचिकेत स्पष्ट करण्यात आले होते.
जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी फेटाळलेल्या तक्रारीच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेवर २० नोव्हेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अमित महाजन यांच्यासमोर सुनावणी झाली. "ज्येष्ठ नागरिकाला त्याच्या स्वतःच्या घरात इच्छेविरुद्ध मुलांसोबत राहण्याची सक्ती करता येणार नाही. विशेषतः जेव्हा दोघांमधील संबंध इतके बिघडलेले आहेत की, याचिकाकर्त्याला २०२२ पासून सातत्याने कायदेशीर लढा द्यावा लागत आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांची मदत घ्यावी लागत आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी याचिकाकर्त्याला आपल्या घरात शांततेने आणि सन्मानाने राहण्याचा हक्क आहे," न्यायमूर्ती अमित महाजन यांनी स्पष्ट केले.
मुलांमधील व्यावसायिक वादामुळे याचिकाकर्त्यांच्या आरोपांच्या सत्यतेवर शंका घेता येणार नाही किंवा ज्येष्ठ नागरिक कायद्यांतर्गत मिळणारे संरक्षण त्यांना नाकारता येणार नाही, असेही न्यायमूर्ती महाजन यांनी स्पष्ट केले. मुलांकडून होणारा ज्येष्ठ नागरिकांचा छळ हा अनेकदा घराच्या चार भिंतींच्या आत होत असल्याने त्याचे स्वतंत्र पुरावे देणे कठीण असते. त्यामुळे घर रिकामे करण्याचे आदेश देण्यापूर्वी छळाचे आरोप ठोस पुराव्यानिशी सिद्ध करण्याची कायद्यात आवश्यकता नाही.मालमत्तेतून मुलांना बाहेर काढण्याची मागणी करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला त्यांचा छळ झालाच आहे, हे दाखवून देण्याची गरज नाही. स्वतःच्या घरात शांततेने आणि सन्मानाने राहण्यासाठी आपल्या मालमत्तेचे संरक्षण करणे आवश्यक आहे, इतके दाखवून देणेही पुरेसे आहे," असेही न्यायमूर्ती अमित महाजन यांनी आपल्या निकालात नमूद केले आहे.
न्यायालयाने मुलगा आणि सुनेला चार आठवड्यांत घर रिकामे करण्याचे आदेश दिले असून, या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यकता भासल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी याचिकाकर्त्याला सर्वतोपरी मदत करावी, असे निर्देशही दिले आहेत.