

New Year Celebration
बेंगळुरू: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मद्यपान करून धुंद झालेल्या आणि स्वतःच्या पायावर उभे राहता येत नसलेल्या लोकांसाठी कर्नाटक सरकारने एक अनोखा निर्णय घेतला आहे. अशा 'अति-मद्यधुंद' व्यक्तींना सुरक्षितपणे त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आता कर्नाटक पोलीस पार पाडणार आहेत. राज्याचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी आज ही घोषणा केली.
बेंगळुरू पोलीस नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ही घरी सोडण्याची सुविधा उपलब्ध करून देणार आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, पत्रकारांशी बोलताना जी. परमेश्वरा यांनी सांगितले की, सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद होण्याच्या घटना प्रामुख्याने बेंगळुरू, म्हैसूर, हुबळी, बेळगाव आणि मंगळुरूमध्ये जास्त प्रमाणात आढळतात. त्यामुळे सरकारने अशा १५ जागा निश्चित केल्या आहेत जिथे नशा उतरेपर्यंत लोक विश्रांती घेऊ शकतात.
ते पुढे म्हणाले, "आम्ही प्रत्येकाला घरी सोडणार नाही. ज्यांनी खूप जास्त मद्यपान केले आहे, ज्यांना चालता येत नाही किंवा जे बेशुद्धावस्थेत आहेत, केवळ अशाच लोकांना नेले जाईल. आम्ही १५ ठिकाणी विश्रांतीची सोय केली आहे. तिथे नशा उतरेपर्यंत त्यांना ठेवले जाईल आणि त्यानंतर घरी पाठवले जाईल."
महिलांच्या सुरक्षिततेबाबत बोलताना गृहमंत्री म्हणाले, "विशेषतः महिलांच्या बाबतीत, त्या वेळी त्या कोणत्या परिस्थितीत असतील हे सांगणे कठीण असते. काही जणी बेशुद्धावस्थेत असू शकतात. अशा वेळी काहीही घडू शकते. म्हणूनच आम्ही खबरदारीचे उपाय म्हणून ही व्यवस्था केली आहे. या परिस्थितीचा कोणी गैरफायदा घेऊ नये याची आम्हाला खात्री करायची आहे. यासाठी आम्ही सर्व ३० जिल्ह्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत."
मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांविरुद्धच्या कारवाईबद्दल बोलताना ते म्हणाले की, पोलिसांनी बॉडी कॅमेरे वापरावेत आणि कमांड सेंटरशी कनेक्ट राहावे, अशा सूचना दिल्या आहेत. "ड्रंक-अँड-ड्राइव्हचे गुन्हे नेहमीप्रमाणे नोंदवले जातील. आम्ही १६० ठिकाणे निवडली आहेत. मद्यपानाची एक ठराविक मर्यादा ओलांडली की वाहन चालवणे कठीण होते. त्यामुळे अपघात होऊन स्वतःचा किंवा इतरांचा जीव जाऊ शकतो. जर आपण दोन दिवस परिस्थितीवर नियंत्रण ठेवले, तर अनेक जीव वाचवता येतील."
कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी 'X' वर एका पोस्टद्वारे माहिती दिली की, बेंगळुरूमध्ये सुरक्षेसाठी २०,००० हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत, ज्यात महिलांच्या विशेष पथकांचाही समावेश आहे. शिवकुमार यांनी म्हटले, "बेंगळुरू २०२६ चे स्वागत सुरक्षितपणे करण्यासाठी सज्ज आहे. गर्दी आणि रहदारीवर लक्ष ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. असुरक्षित ड्रायव्हिंग आणि इतर धोके टाळण्यासाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत."