

Matrimonial Site Fraud
उत्तर प्रदेश : मॅट्रिमोनियल साईटवर डॉक्टर असल्याचे सांगून एका तरुणाने तरुणीशी मैत्री केली. त्याने तिला एका रेस्टॉरंटमध्ये भेटायला बोलावले. भेटीनंतर एका व्यक्तीला भेटण्याच्या बहाण्याने तो तरुणीची स्कूटी घेऊन पसार झाला. त्या स्कूटीमध्ये तरुणीचे दागिने आणि पर्स होती. पोलीस आता गुन्हा दाखल करून भामट्याचा शोध घेत आहेत.
शाहगंज येथील दौरेठा भागात राहणाऱ्या एका तरुणीने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. तिने लग्नासाठी 'शादी डॉट कॉम' वेबसाइटवर प्रोफाईल तयार केले होते. तिथे डॉ. शिवकुमार शर्मा नावाच्या प्रोफाईलशी मॅच झाल्यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. त्यानंतर, कथित डॉक्टर शिवकुमारने तिला दिल्ली हायवेच्या सर्व्हिस रोडवरील एसआरके मॉलमध्ये असलेल्या 'बर्गर किंग' रेस्टॉरंटमध्ये भेटायला बोलावले. काही वेळ गप्पा मारल्यानंतर शिवकुमारने त्याला आपल्या मित्राला आणि वहिनीला भेटायला जायचे असल्याचे सांगितले.
तरुणी त्याच्यासोबत स्वतःच्या स्कूटीवर बसून निघाली. काही अंतर गेल्यावर त्याने आपला मित्र एसआरके मॉलमध्ये पोहोचल्याचे सांगून स्कूटी परत वळवली. मॉलमध्ये पोहोचल्यावर तरुणी पार्किंगची पावती घेण्यासाठी खाली उतरली. इतक्यात आरोपी स्कूटी घेऊन पळून गेला. स्कूटीच्या डिक्कीत ठेवलेल्या पर्समध्ये तिचे दागिने आणि रोकड होती. न्यू आग्रा पोलीस निरीक्षकांनी सांगितले की, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेतला जात आहे.
पूर्वी ऑनलाइन जुन्या वस्तू खरेदी-विक्रीच्या नावाखाली ट्रायल घेण्याच्या बहाण्याने गुन्हेगार दुचाकी, कार आणि इतर सामान घेऊन पळून जात असत. आता मॅट्रिमोनियल साईट्ससह विविध ॲप्सवर मैत्री करून लोकांचे सामान लंपास केले जात आहे.