June 2026 rule changes
नवी दिल्ली: १ जून पासून देशभरात काही महत्त्वाचे आर्थिक आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित बदल लागू होणार आहेत. या बदलांचा थेट परिणाम घरगुती बजेट, बँक व्यवहार, विमान प्रवास आणि सौरऊर्जा प्रकल्पांवर होणार आहे. एलपीजी सिलिंडरच्या किंमतींपासून एचडीएफसी बँकेच्या नव्या नियमांपर्यंत अनेक बदल सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे ठरणार आहेत.
दर महिन्याच्या १ तारखेला तेल विपणन कंपन्यांकडून एलपीजी सिलेंडरच्या दरांचा आढावा घेतला जातो. त्यामुळे १ जूनपासून घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मध्यपूर्वेतील तणावामुळे मागील काही महिन्यांत गॅस दरांमध्ये वाढ झाली होती.
तेल कंपन्यांकडून एअर टर्बाइन फ्यूल अर्थात विमान इंधनाच्या किंमतीतही दर महिन्याला बदल केला जातो. ATF दर वाढल्यास त्याचा थेट परिणाम विमान प्रवासाच्या तिकिटांवर होतो. मध्यपूर्वेतील तणावामुळे जेट इंधनाच्या किंमतीतही चढ-उतार सुरू आहेत. सध्या दिल्लीत एटीएफची किंमत प्रति किलोलीटर १,०४,९२७ रुपयांवर पोहोचली आहे.
१ जूनपासून एचडीएफसी बँक नवीन नियम लागू करणार आहे. बँकेच्या माहितीनुसार, लहान नोटा आणि नाणी जमा करण्यासाठी मासिक मर्यादा निश्चित करण्यात येणार आहे. आतापर्यंत अशा ठेवींवर कोणतीही मासिक मर्यादा नव्हती. मात्र नोटा जमा करण्यावर सुमारे ४ टक्के आणि नाणी जमा करण्यावर ५ टक्क्यांपर्यंत शुल्क आकारले जात होते.
नव्या नियमानुसार, २० रुपये किंवा त्यापेक्षा कमी मूल्याच्या नोटांसाठी दरमहा १० हजार रुपयांची मर्यादा असेल. तर नाण्यांसाठी ही मर्यादा ५ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. यापेक्षा जास्त रक्कम जमा केल्यास अतिरिक्त २ टक्के शुल्क आकारले जाणार आहे.
सौरऊर्जा क्षेत्रातही महत्त्वाचा बदल लागू होणार आहे. Approved List of Models and Manufacturers (ALMM List-II) लागू केल्यानंतर सरकारी योजना आणि अनुदानित प्रकल्पांमध्ये केवळ मंजूर यादीतील सोलर मॉड्यूल आणि सेलच वापरता येणार आहेत. गुणवत्तेची खात्री करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असला, तरी त्यामुळे सोलर पॅनलच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जून महिन्यात विविध सण आणि विशेष दिवसांमुळे बँकांना अनेक सुट्ट्या असणार आहेत. मोहरम, संत गुरु कबीर जयंतीसह विविध कारणांमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. RBI च्या सुट्टीच्या यादीनुसार दुसरा आणि चौथा शनिवार तसेच रविवार वगळता १५, २५, २६, २९ आणि ३० जून रोजीही काही ठिकाणी बँक व्यवहार बंद राहणार आहेत. मात्र ऑनलाइन बँकिंग सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहतील.