Video: हॉटेलच्या खोलीत पाय ठेवताच कोसळली, अवघ्या ५ सेकंदांत झाला मृत्यू! ३ महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न, काय घडलं?

Muskan Sidoulia Hotel Death Case: लग्नाला अवघे तीन महिने झालेल्या २८ वर्षीय मुस्कान सिदौलिया हिचा हॉटेलमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला.
Muskan Sidoulia Hotel Death Case
Muskan Sidoulia Hotel Death CasePudhari
Published on: 
Updated on: 

Muskan Sidoulia Hotel Death Case: उत्तर प्रदेशातील झाशी येथे लग्नाला अवघे तीन महिने झालेल्या एका नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. मुस्कान सिदौलिया (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे. ती रेल्वेतील कनिष्ठ अभियंता (JE) पदाची परीक्षा देण्यासाठी माहेरी आली होती. मात्र, हॉटेलच्या खोलीत गेल्यानंतर अवघ्या पाच सेकंदांत ती जमिनीवर कोसळल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या घटनेनंतर मुस्कानच्या वडिलांनी तिचा पती नीलेश याच्यावर हत्येचा संशय व्यक्त केला आहे. नीलेशचे यापूर्वीच लग्न झाले होते आणि त्याने ही बाब लपवून मुस्कानशी दुसरे लग्न केल्याचा आरोपही तिच्या वडिलांनी केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नीलेशला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

लग्नानंतर पतीच्या पहिल्या लग्नाची माहिती समोर आल्याचा दावा

मुस्कानचे वडील रामजीलाल अहिरवार हे झाशीतील प्रेमनगर परिसरात राहतात. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ जून २०२६ रोजी मुस्कानचा विवाह मध्य प्रदेशातील विदिशा येथील नीलेशसोबत झाला होता. नीलेश हा अविनाश यांचा मुलगा आहे. कुटुंबीयांनी मोठ्या थाटामाटात हा विवाह केला होता.

मात्र, लग्नानंतर काही दिवसांनी मुस्कानला तिच्या पतीचे यापूर्वीच लग्न झाल्याचे समजल्याचा दावा तिच्या वडिलांनी केला आहे. नीलेशची पहिली पत्नी इंदूर येथे राहत असल्याचेही त्यांनी सांगितले.

वडिलांच्या आरोपानुसार, लग्नापूर्वी नीलेशच्या कुटुंबीयांनी ही बाब लपवून ठेवली होती. मुस्कानला सत्य समजल्यानंतर पती तिचा छळ करू लागला. तो पहिल्या पत्नीची स्तुती करून मुस्कानला टोमणे मारत असे. यावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याचेही तिच्या वडिलांनी सांगितले.

रेल्वेची परीक्षा देण्यासाठी आली होती माहेरी

मुस्कानची २८ ऑक्टोबर रोजी रेल्वेतील कनिष्ठ अभियंता पदासाठी परीक्षा होणार होती. त्यामुळे तिचे वडील १० ऑक्टोबर रोजी तिला सासरहून झाशी येथे माहेरी घेऊन आले होते.

दरम्यान, २३ ऑक्टोबरच्या रात्री नीलेश झाशी येथे पोहोचला. मुस्कानला आपल्या मावशीच्या घरी गणेश विहार येथे घेऊन जायचे असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर तो तिला सोबत घेऊन गेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी कुटुंबीयांनी मुस्कानशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी नीलेशने सुरुवातीला ते रुद्र हॉटेलमध्ये असल्याचे सांगितले. काही वेळाने त्याने मुस्कानला रुग्णालयात नेल्याची माहिती दिली. कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली, तेव्हा मुस्कानचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

Muskan Sidoulia Hotel Death Case
Central Railway Local Train Delay: मध्य रेल्वेचा खोळंबा! लोकल ५२ मिनिटे उशिराने; प्रवाशांचे हाल, नेमकं काय घडलं?

‘माझ्या मुलीची हत्या झाली’; वडिलांचा गंभीर आरोप

मुस्कानचा मृत्यू हा हॉटेलच्या खोलीत अचानक पडल्यामुळे झाल्याचे नीलेशने सांगितल्याचा दावा तिच्या वडिलांनी केला आहे. मात्र, त्याच्या या स्पष्टीकरणावर कुटुंबीयांनी अविश्वास व्यक्त केला आहे.

मुस्कानच्या डोक्यावर जखमेच्या खुणा असल्याचे तिच्या वडिलांचे म्हणणे आहे. नीलेशने मुस्कानचे तोंड पकडून तिचे डोके भिंतीवर आपटले असावे, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी मुस्कानच्या वडिलांनी केली आहे.

सीसीटीव्हीमध्ये नेमके काय दिसले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुस्कान आणि नीलेश झाशीतील ऋषभ हॉटेलच्या खोली क्रमांक २१२ मध्ये थांबले होते. हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुस्कान खोलीत प्रवेश केल्यानंतर काही सेकंदांतच जमिनीवर कोसळताना दिसत आहे.

यानंतर हॉटेलमधील कर्मचाऱ्यांच्या मदतीने तिला ऑटोरिक्षातून जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

या घटनेबाबत झाशीच्या शहर पोलीस अधीक्षक प्रीती सिंह यांनी माहिती दिली आहे. पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून, मुस्कानच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांचाही तपास सुरू आहे.

Muskan Sidoulia Hotel Death Case
Chandivali Car Accident: चांदिवलीत हिट अँड रन; मद्यधुंद अवस्थेत महिलेने चौघांना ठोकरले

शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार

मुस्कानचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याचे स्पष्ट कारण शवविच्छेदन अहवालानंतर समोर येण्याची शक्यता आहे.

सध्या पोलिसांनी नीलेशला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. सीसीटीव्ही फुटेज, कुटुंबीयांचे आरोप आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील तपास केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news