

Jaipur Government School CJP: जयपूरमधील रामपुरा कवंरपुरा गावातील सरकारी शाळा जमीनदोस्त करण्यात आली आहे. ही तीच शाळा आहे ज्यासाठी कॉकरोज जनता पार्टीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी कथित ग्रामस्थांचा मार खाल्ला होता. २१ ऑगस्ट रोजी स्कूल ठीक करो या मोहीमेखाली सीजेपीचे कार्यकर्ते हे या शाळेची पहाणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी तिथल्या कथित ग्रामस्थांनी या कार्यकर्त्यांवर हल्ला केला होता. विशेष म्हणजे त्यावेळी सीजेपीचे प्रवक्ते असणाऱ्या आशुतोष रांका यांच्यावर देखील हल्ला झाला होता.
आज ही शाळा जमीनदोस्त करण्यात आली आहे. सरकारने सांगितलं की या ठिकाणी आता १८ लाख रूपयात नवीन इमारत उभारली जाणार आहे. आता कॉकरोज जनता पार्टीने हे त्यांचे यश असल्याचं सांगण्यास सुरूवात केली आहे. पक्षाचे सह समन्वयक आशुतोष रांका यांनी ही शाळा गोठ्यातून चालवली जात होती असा आरोप केला होता.
रांका यांनी ट्वटि केलं की, 'आमच्या पाहणी दौऱ्यावेळी आमच्यावर दगडफेक करण्यात आली. आमच्या महिला कार्यकर्त्यांवर हल्ला करण्यात आला. आमच्या गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. मात्र आता मुलांसाठी चांगली शाळा बांधली जात आहे त्यामुळं हे सर्व फळाला आलं असं म्हणता येईल.'
बागरू विधानसभा मतदार संघात येणाऱ्या या शाळेला सप्टेंबर २०२५ मध्ये धोकादायक शाळा म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यामुळं ही शाळा वापरात नव्हती. तेव्हापासून या शाळेतील १८ विद्यार्थ्यांचे वर्ग हे गावातील पत्र्याच्या शेडमध्ये भरत होते. त्याच भागात म्हैशी देखील बांधल्या जात होत्या.