ISRO Scientists Resign: १०० हून अधिक शास्त्रज्ञांचे राजीनामे; ‘गगनयान’ मोहिमेसाठी ‘इस्रो’ सतर्क, जारी केला मेमो

'गगनयान'सह महत्त्वाच्या मोहिमांमधील शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या राजीनाम्यांवर घालणार 'वेसण'
ISRO Scientists Resign
प्रातिनिधिक छायाचित्र.Pudhari
Published on
Updated on

ISRO Scientists Resign : भारताची महत्त्वाकांक्षी मानवी अंतराळ मोहीम 'गगनयान' आणि इतर राष्ट्रीय महत्त्वाच्या प्रकल्पांना मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही महिन्यांत इस्रोमधील (ISRO) तब्बल १०० ते १२० अनुभवी शास्त्रज्ञांनी अचानक राजीनामे दिले आहेत. या राजीनामा लाटेमुळे निर्माण झालेली तज्ज्ञांची कमतरता लक्षात घेता, अंतराळ विभागाने (DoS) एक अत्यंत महत्त्वाचा आणि कडक निर्णय घेतला आहे. आता महत्त्वाच्या मोहिमांवर काम करणाऱ्या वर्ग 'अ' च्या शास्त्रज्ञांचे राजीनामे किंवा स्वेच्छानिवृत्ती (VRS) थेट मंजूर न करता, त्यासाठीचे नियम कमालीचे कडक करण्यात आले आहेत.

सुमारे १०० शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे राजीनामे

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) देशातील विविध केंद्रांमधून जवळपास १०० शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांनी राजीनामा सादर केला आहे. आता 'गगनयान'सारख्या देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील मोहिमांवर कार्यरत असलेल्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची ही गळती रोखण्यासाठी अंतराळ विभागाने एक विशेष कार्यालयीन निवेदन (Memorandum) जारी केले आहे.

ISRO Scientists Resign
ISRO Dam Audit : ‘इस्रो’च्या साहाय्याने महाराष्ट्रातील २५०० धरणांचे ऑडिट: AI-मशिन लर्निंग तंत्रज्ञानाचा प्रथमच होणार वापर
Pudhari

अंतराळ विभागाच्या वतीने मेमो जारी

अंतराळ विभागाचे संयुक्त सचिव (कर्मचारी) एस. आर. राजशेखर यांच्या स्वाक्षरीने १४ जुलै २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, "असे निदर्शनास आले आहे की, इस्रोमधील ग्रुप 'A' चे वैज्ञानिक आणि तांत्रिक कर्मचारी, ज्यांच्याकडे गगनयान आणि इतर अत्यंत महत्त्वाच्या राष्ट्रीय मोहिमांची जबाबदारी आहे, त्यांच्याकडून स्वेच्छानिवृत्ती (VRS) आणि राजीनाम्यांचे अर्ज मोठ्या प्रमाणावर येत आहेत. यामुळे देशाच्या महत्त्वाच्या मोहिमांवर अत्यंत गंभीर परिणाम होत आहे."

ISRO Scientists Resign
Jalgaon Students Isro Visit | विमानाने 'इस्रो'ची वारी, जळगावच्या आदिवासी पोरांची गरुडझेप

मोहिमा पूर्ण होईपर्यंत राजीनामा मंजूर नाही!

इस्रोच्या सर्व केंद्रांच्या संचालकांना आणि युनिट प्रमुखांना पाठवलेल्या या पत्रात या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्यास सांगितले आहे. गगनयान किंवा इतर महत्त्वाचे प्रकल्प पूर्ण होईपर्यंत या प्रकल्पांशी जोडलेल्या ग्रुप 'A' च्या वैज्ञानिक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचे राजीनामे किंवा स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज स्वीकारू नयेत, असे थेट आदेश देण्यात आले आहेत.

राजीनामे सरसकट मंजूर केले जाणार नाहीत

"गगनयान आणि इतर महत्त्वाच्या मोहिमांवर कार्यरत असलेल्या वैज्ञानिक आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचे स्वेच्छानिवृत्ती आणि राजीनाम्याचे अर्ज नेहमीप्रमाणे सहज आणि सरसकट (Routine Matter) मंजूर केले जाणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे," असे या निवेदनात स्पष्ट केले आहे. अशा कर्मचाऱ्यांचे (अगदी शास्त्रज्ञ/अभियंते-SG आणि त्याखालील दर्जाच्या अधिकाऱ्यांचेही) अर्ज आले, तर ते केंद्राच्या किंवा युनिट प्रमुखांच्या स्पष्ट शिफारसीसह अंतिम निर्णयासाठी थेट अंतराळ विभागाकडे (DoS) पाठवावे लागतील.

ISRO Scientists Resign
ISRO Humanoid Robot | ‘इस्रो’ची यंत्रयुवती एक क्रांतिकारी पाऊल

मनुष्‍यबळाचे कोणतेही संकट नाही: केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी इस्रोमध्ये मनुष्‍यबळाचे (कर्मचाऱ्यांचे) कोणतेही मोठे संकट नसल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, "या विषयावर इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी आधीच भूमिका स्पष्ट केली आहे. जितके लोग जातील, तितके नवीन लोक येतील; प्रकल्पाचे काम थांबणार नाही. आमची टीम खूप मोठी आहे. लोक येत-जात राहतात. हे निवेदन केवळ एवढ्यासाठी काढण्यात आले आहे की, राजीनाम्यासारखे निर्णय अधिक परिपक्व पातळीवर घेतले जावेत."

निवृत्त झालेले तज्ज्ञही प्रकल्पांशी जोडलेले राहतात

"इस्रोमध्ये सातत्याने काम करण्याची एक उत्तम संस्कृती आहे. निवृत्त झालेले तज्ज्ञही प्रकल्पांशी जोडलेले राहतात. उदाहरणार्थ, माजी प्रमुख एस. सोमनाथ यांनी गगनयान मोहिमेवर खूप जवळून काम केले आहे. आता ते पदावर नाहीत, याचा अर्थ गगनयानचे काम थांबले का? नक्कीच नाही."

ISRO Scientists Resign
Dharali Cloudburst ISRO Images | उत्तरकाशीत 'खीर गंगा' नदीने पुन्हा घेतला जुना मार्ग? 'इस्रो'च्या उपग्रह छायाचित्रांमुळे चर्चेला उधाण

इस्रोमधील रिक्त पदांची आकडेवारी काय सांगते?

संसदेच्या गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात, ११ फेब्रुवारी २०२६ रोजी इस्रोमधील रिक्त जागांविषयी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी खालील माहिती दिली होती की, संस्थेत एकूण मंजूर पदे (विज्ञान, तंत्रज्ञान आणि प्रशासन मिळून): १८,१४२ आहेत. यातील रिक्त पदे २,६१३ आहेत. भरती प्रक्रिया सुरू असून १,४४९ काम सुरू आहे. दरम्यान, मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेली १,४४९ पदांची भरती प्रक्रिया ऑक्टोबर २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. तर उर्वरित ९३३ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल.

'गगनयान' मोहिमेला विलंब

भारताची अत्यंत महत्त्वाकांक्षी 'गगनयान' मोहीम सध्या ठरलेल्या वेळापत्रकापेक्षा मागे पडली आहे. गगनयानची पहिली मानवरहित चाचणी मोहीम म्हणजेच 'HLVM3 G1/ OM1' २०२६ च्या पहिल्या तिमाहीत प्रक्षेपित करण्याचे नियोजन होते, परंतु काही कारणांमुळे या मोहिमेला विलंब झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news