

पुणे : राज्यातील २ हजार ५०० धरणांचे लवकरच ऑडिट केले जाणार असून, त्यांचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी इस्रो (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन) आणि सीडल्ब्यूपीआरएस पुणे (सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन) या दोन संस्थांत सामंजस्य करार झाला आहे. इस्रो ही संस्था उपग्रहांच्या साहाय्याने धरणांची निरीक्षणे करून देण्यास तांत्रिक साहाय्य करणार आहे. त्यामुळे धरणातील त्रुटी, बिघाड, पाण्याची गुणवत्ताही कळण्यास मदत होणार आहे.
पुणे शहरातील खडकवासला भागात ११० वर्षे जुनी केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र ( सीडब्ल्यूपीआरएस) ही संस्था आहे. देशातील ६ हजार धरणांची देखभाल करण्याची तांत्रिक जबाबदारी याच संस्थेकडे आहे. यात महाराष्ट्रातील २ हजार ५०० धरणांचा समावेश आहे. जल आणि ऊर्जा संशोधनातील ही देशातील सर्वांत जुनी संस्था पुण्यात कार्यरत असून, ती केंद्रीय जलशक्ती मंत्रालयांतर्गत येते. देशातील धरणे, नद्या, बंदरे आणि जलविद्युत संशोधनावर मॉडेल तयार करण्याचे काम करते. या संस्थेचा १४ जून रोजी ११० वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत संस्थेचे प्रभारी संचालक ए. ए. पुरोहित यांनी ही माहिती दिली. या वेळी अतिरिक्त संचालक डॉ. एम. बालन यांचीही उपस्थिती होती.
१ जून २०२६ रोजी या दोन संस्थांत देशातील जलस्रोत व्यस्थापनासाठी उपग्रह तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यासाठी सामंजस्य करार झाला.
एकूण २४ प्रमुख क्षेत्रांत यात काम होणार आहे. यात धरणातील धोके ओळखणे, जलसाठ्यांतील मायक्रोप्लास्टिक शोधणे, धरणातील गाळ, पाण्याची गुणवत्ता देखील तपासली जाणार आहे.
इस्रो उपग्रहाच्या साहाय्याने तांत्रिक माहिती जलशक्ती मंत्रालयाला देणार. या डेटाचा वापर करून पुण्यातील सीडल्ब्यूपीआरएस ही संस्था राज्यातील २ हजार ५०० धरणांचे ऑडिट करणार आहे.
इस्रोद्वारे अवकाशातील उपग्रह धरणांचे निरीक्षण देईल तसेच ड्रोन तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशिन लर्निंगचा वापर यात होणार आहे.
प्रभारी संचालक पुरोहित यांनी सांगितले की, आमच्या कामाचा व्याप प्रचंड आहे. देशातील ६ हजार धरणांची जबाबदारी आहे. यात महाराष्ट्रातील २ हजार ५०० धरणांचा समावेश आहे. यासह आम्ही भूतान, नेपाळ, अफगाणिस्तान या देशांतील धरणांचेही काम करीत आहोत.
पुण्यातील खडकवासला भागातील केंद्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्राचा १४ जून रोजी ११० वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे. ही संस्था इंग्रजांनी १९१६ मध्ये स्थापन केली. तेव्हापासून तेथे पाणी, धरण, बंदरे यांवर संशोधन होत आहे. वर्धापनदिनी विविधि कार्यक्रम होणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून महापालिका आयुक्त नवल किशोर राम उपस्थित राहणार आहेत. या वेळी शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांना धरण, बंदर, जहाज यांचे मॉडेल बघायला मिळणार आहे. १४ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.