

Health News
नवी दिल्ली : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सर्रास वापरली जाणारी लैंगिक उत्तेजक औषधे आणि सप्लिमेंट्स आता जीवघेणी ठरत आहेत. मेडिकल स्टोअर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर खुलेआम विकली जाणारी ही औषधे वापरणाऱ्यांसाठी गंभीर आरोग्य समस्या निर्माण करत आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) आणि भारतीय औषध महानियंत्रक (DCGI) च्या तज्ज्ञांनी यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
या औषधांचा थेट परिणाम हृदय, किडनी आणि मानसिक आरोग्यावर होतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. तरीही, आकर्षक जाहिराती आणि सोशल मीडियावरील जाहिरातीला बळी पडून अनेक जण ही औषधे खरेदी करत आहेत, ज्यामुळे ते विविध आजारांना बळी पडत आहेत.
भारतात लैंगिक उत्तेजक औषधांचा बाजार प्रचंड वेगाने वाढत आहे. आयएमएआरसी ग्रुप आणि इंडियन फार्मा एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या अहवालानुसार, २०२४ पर्यंत हा बाजार ७,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे आणि दरवर्षी त्यात १० ते १२% वाढ होत आहे. यात प्रिस्क्रिप्शन औषधांसोबतच 'हर्बल' आणि 'स्टॅमिना बूस्टर' नावाखाली विकली जाणारी उत्पादनेही मोठ्या प्रमाणात आहेत. यातील धक्कादायक बाब म्हणजे, या एकूण बाजारातील ४०% पेक्षा जास्त, म्हणजे सुमारे ३,००० कोटी रुपयांची उलाढाल बेकायदेशीर आणि अनियंत्रित आहे. ही उत्पादने कोणत्याही परवान्याशिवाय विकली जातात.
आरोग्य मंत्रालयाच्या केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेच्या (CDSCO) अहवालानुसार, २०२० नंतर लैंगिक वर्धक औषधांच्या जाहिरातींमध्ये दुप्पट वाढ झाली आहे. या उत्पादनांना "सुरक्षित हर्बल" किंवा "क्लिनिकली टेस्टेड" असे सांगून विकले जात आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते, या दाव्यांचा वैज्ञानिक आधार कमी असून, बहुतेक औषधांमध्ये सिल्डेनाफिल, टाडालाफिल किंवा स्टेरॉइड्स मिसळले जातात, जे अतिशय धोकादायक आहेत. "हृदयविकार किंवा उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी अशी औषधे घेतल्यास त्यांना हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक येण्याचा धोका वाढतो," असे तज्ञ सांगतात.
ड्रग्स अँड मॅजिक रेमेडीज अधिनियम, १९५४ नुसार लैंगिक उत्तेजक औषधांच्या जाहिरातींवर बंदी आहे. तरीही, इंटरनेटवर सर्रास त्यांचा प्रचार सुरू आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाला (FSSAI) देखील अनेक हर्बल सप्लिमेंट्समध्ये भेसळ आढळली आहे. २०२४ मध्ये केलेल्या तपासणीत त्यांना आढळले की, हर्बल उत्पादने म्हणून विकल्या जाणाऱ्या ९०% कंपन्या नियमांचे पालन करत नाहीत.
जगभरातील या औषधांच्या बाजारात सर्वात मोठी बाजारपेठ अमेरिका आहे. अहवालानुसार, २०२४ मध्ये अमेरिकेचा बाजार सुमारे ४०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त होता, जो जगातील एकूण व्यवसायाचा सर्वात मोठा भाग आहे. त्यानंतर युरोप (विशेषतः जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन) आणि आशियामध्ये चीन आणि भारत वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठा आहेत.
तज्ज्ञ यावर काही सुरक्षित पर्याय सुचवतात:
औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि धूम्रपान-दारूपासून दूर राहून जीवनशैलीत सुधारा.
केवळ परवानाधारक आणि चाचणी केलेल्या उत्पादनांचाच वापर करा.