Indian Army Drone units Bhairav Rudra Brigade
नवी दिल्ली : भारतीय लष्करात मोठा संघटनात्मक बदल होणार असून, प्रत्येक बटालियन पातळीवर ड्रोन आणि काऊंटर-ड्रोन प्रणाली ही मानक शस्त्र प्रणाली म्हणून समाविष्ट केली जाणार आहे. 'ऑपरेशन सिंदूर'नंतर लष्कराची ही मोठी वाटचाल सुरु झाली आहे. या बदलांमध्ये 'लाइट कमांडो बटालियन', 'रुद्र ब्रिगेड', 'ड्रोन युनिट्स' आणि 'स्पेशल आर्टिलरी बॅटर्या' यांचा समावेश आहे. या बदलांमुळे लष्कर भविष्यातील पारंपरिक व हायब्रिड युद्धांसाठी अधिक सक्षम होणार आहे.
'द इंडियन एक्सप्रेस' ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या अनेक महिन्यांपासून या योजनांवर चर्चा सुरू होती, मात्र मे महिन्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राबवण्यात आलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर या प्रक्रियेला वेग आला आहे. या बदलांपैकी काही बदल या ऑपरेशनमधून मिळालेल्या अनुभवांवर आधारित असतील.
या बदलांमधील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे रेजिमेंटमध्ये ड्रोन्स आणि ड्रोनविरोधी प्रणालींचा समावेश करणे. सध्या बटालियनकडे ड्रोन्स असले तरी, त्यांचा वापर प्रस्थापित शस्त्रास्त्रांव्यतिरिक्त दुय्यम प्रणाली म्हणून केला जातो. यामुळे, प्राथमिक जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या सैनिकांनाच ड्रोन चालवण्यासाठी वळवावे लागते. आता प्रत्येक युनिटमध्ये एक तुकडी तयार करण्यात येणार असून या तुकडीचे मुख्य काम हे फक्त ड्रोन चालवणे असेल. भारतीय लष्करातील प्रत्येक विभागाला याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी विविध विभागांमधून सुमारे ७० सैनिकांची नव्याने नियुक्ती करावी लागेल आणि काहींच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करावा लागेल.
भारतीय लष्कर 'भैरव' नावाने ३० कमांडो बटालियन (Light Commando Battalions) तयार करत आहे. प्रत्येक बटालियनमध्ये सुमारे २५० सैनिक असतील. या बटालियनना विशेष प्रशिक्षण दिले जाईल आणि विशिष्ट मोहिमांसाठी तयार केलेल्या तुकड्यांसह हल्ल्याची क्षमता वाढवण्यासाठी त्यांना नियुक्त केलेल्या भागात तैनात केले जाईल.
याशिवाय, लष्कर 'रुद्र' ब्रिगेडची स्थापना करणार आहे, ज्यात सर्व शस्त्रप्रणालींनी युक्त ब्रिगेडसह (All-arms Brigade) ड्रोन्स आणि इतर लॉजिस्टिक घटक असतील. यासाठी सध्याच्या पायदळ, चिलखती आणि तोफखाना ब्रिगेडची पुनर्रचना केली जाईल. यामुळे 'रुद्र' ब्रिगेड भविष्यातील युद्धांसाठी एकात्मिक युनिट म्हणून विविध क्षेत्रांमध्ये स्वतंत्रपणे काम करू शकतील.
तोफखाना रेजिमेंट (Artillery): प्रत्येक रेजिमेंटमध्ये दोन बॅटरी तयार करणे आणि त्यातील तोफांची संख्या वाढवणे, तसेच टेहळणी आणि लढाऊ ड्रोन्सने सुसज्ज तिसरी ड्रोन बॅटरी जोडण्याचा विचार सुरू आहे.
'दिव्यास्त्र' बॅटरी: 'दिव्यास्त्र' नावाच्या तोफखाना बॅटरी तयार केल्या जात आहेत, ज्यात पुढच्या पिढीतील लांब पल्ल्याच्या तोफा आणि लॉइटरिंग म्युनिशन्स (लक्ष्यावर घिरट्या घालून हल्ला करणारे ड्रोन) असतील.
चिलखती आणि यांत्रिकी पायदळ (Armoured and Mechanized Infantry): टेहळणी करणाऱ्या 'रेकी प्लाटून'ला आता टेहळणी आणि लढाऊ ड्रोन्सने सुसज्ज केले जाईल.
इंजिनिअर रेजिमेंट: प्रत्येक कंपनीत सुरुंग शोधण्यासाठी, टेहळणीसाठी आणि परिसराचा नकाशा तयार करण्यासाठी एक ड्रोन सेक्शन सुरू करण्याची योजना आहे.
आर्मी एव्हिएशन कोअर: हेलिकॉप्टर आणि वैमानिकांवरील भार कमी करण्यासाठी टेहळणी आणि डेटा संकलनासाठी अधिक ड्रोन्स समाविष्ट केले जात आहेत.
EME कोअर: ड्रोन दुरुस्तीची क्षमता वाढवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल इंजिनिअर्स (EME) कोअरच्या कार्यशाळांमध्ये सुधारणा केल्या जात आहेत.
या बदलांमुळे विशेष आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची मागणी वाढेल, असे सूत्रांनी सांगितले. ड्रोन आणि इतर नवीन पिढीतील उपकरणांना लढाऊ शाखांसाठी 'प्रमाणित उपकरण' म्हणून समाविष्ट करणे हे यामागील उद्दिष्ट आहे, जेणेकरून त्यांची नियमितपणे खरेदी करता येईल. यामुळे तात्पुरत्या किंवा आपत्कालीन खरेदीऐवजी खरेदीसाठी एक निश्चित पुरवठा साखळी निर्माण होण्यास मदत होईल. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी २६ जुलै रोजी कारगिल विजय दिनानिमित्त यापैकी काही उपक्रमांची घोषणा केली होती.