

Indian Army
नवी दिल्ली : चीन आणि पाकिस्तानकडून वाढता संयुक्त लष्करी धोका भारतासाठी चिंतेचा विषय बनला आहे. नुकत्याच झालेल्या 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान या धोक्याची तीव्रता पुन्हा एकदा अधोरेखित झाली. याच पार्श्वभूमीवर, भारतीय लष्कराने सीमेवर अधिक जलद आणि प्रभावी हल्ला चढवण्यासाठी काही नवीन 'रुद्र' सर्व-शस्त्र ब्रिगेड (all-arms brigades) आणि 'भैरव' लाइट कमांडो बटालियनची स्थापना करण्याचा निर्णय घेतला आहे.
कारगिल विजय दिनानिमित्त द्रास येथे बोलताना लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी लष्कराच्या या आधुनिकीकरणाची घोषणा केली. ते म्हणाले की, लष्कराला 'भविष्यासाठी सज्ज' करण्यासाठी ही महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत.
"आम्ही शांततेची संधी दिली, पण त्यांनी (पाकिस्तानने) भ्याडपणा दाखवला. त्याला आम्ही शौर्यानेच उत्तर दिले. 'ऑपरेशन सिंदूर' हा आमचा निश्चय, आमचा संदेश आणि आमचे प्रत्युत्तर आहे," अशा शब्दांत जनरल द्विवेदी यांनी पाकिस्तानला खडसावले. भविष्यात कोणतीही आगळीक खपवून घेतली जाणार नाही, असा थेट इशाराही त्यांनी दिला. "देशवासीयांचा विश्वास आणि सरकारने दिलेल्या सामरिक स्वायत्ततेमुळेच लष्कराने एक सुनियोजित आणि निर्णायक प्रत्युत्तर दिले," असेही ते म्हणाले.
लष्कराच्या पुनर्रचनेनुसार, आता काही सिंगल-आर्म ब्रिगेडचे रूपांतर 'रुद्र' या सर्व-शस्त्र ब्रिगेडमध्ये केले जाणार आहे. या ब्रिगेडची रचना खास सीमेवरील विशिष्ट भागांसाठी आणि मोहिमांसाठी केली जाईल.
काय आहे वैशिष्ट्य? : 'रुद्र' ब्रिगेडमध्ये पायदळ, रणगाडे, तोफखाना, विशेष दल आणि ड्रोन (UAVs) यांसारखे सर्व लढाऊ घटक कायमस्वरूपी एकत्र तैनात असतील.
काय होणार फायदा? : सध्या हे सर्व घटक केवळ युद्धाच्या किंवा सरावाच्या वेळी एकत्र येतात. आता ते कायम एकत्र असल्याने कोणत्याही क्षणी कारवाईसाठी सज्ज असतील, ज्यामुळे प्रत्युत्तर देण्याचा वेग प्रचंड वाढेल.
सद्यस्थिती : दोन 'रुद्र' ब्रिगेडची स्थापना यापूर्वीच झाली आहे.
लष्कराकडे सध्या शत्रूच्या हद्दीत खोलवर जाऊन कारवाई करण्यासाठी १० पॅरा-स्पेशल फोर्सेस आणि ५ पॅरा (एअरबॉर्न) बटालियन आहेत. यांच्या जोडीला आता नवीन 'भैरव' लाइट कमांडो बटालियनची स्थापना केली जात आहे. या बटालियन अत्यंत चपळ आणि घातक असतील. टप्प्याटप्प्याने अशा ४०-५० 'भैरव' बटालियन उभारण्याची योजना आहे. जनरल द्विवेदी म्हणाले, "चपळ आणि घातक 'भैरव' युनिट्स सीमेवर शत्रूला आश्चर्याचा धक्का देण्यासाठी सज्ज आहेत."
याशिवाय, लष्कराच्या हवाई संरक्षण (Army Air Defence - AAD) क्षमतेतही मोठी वाढ केली जात आहे. चीन सीमेवरील उंच भागांमध्ये हवाई संरक्षणासाठी ८,१६० कोटी रुपये खर्चून 'आकाश प्राइम' या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांच्या दोन नवीन रेजिमेंट तैनात केल्या जाणार आहेत. तसेच, ३६,००० कोटी रुपये खर्चून क्विक रिॲक्शन सरफेस टू एअर मिसाइल (QRSAM) प्रणालीच्या तीन रेजिमेंटही दाखल होणार आहेत. 'आकाश प्राइम' २५ किलोमीटरच्या पल्ल्यातील शत्रूची विमाने, हेलिकॉप्टर आणि ड्रोन नष्ट करू शकते, तर QRSAM ची क्षमता ३० किलोमीटर आहे. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान पाकिस्तानने वापरलेल्या तुर्की बनावटीच्या ड्रोन आणि चिनी क्षेपणास्त्रांना रोखण्यात भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता या नव्या प्रणालींमुळे ही क्षमता अधिकच वाढणार आहे.