Operation Sindoor | 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे पाकिस्तानमधील 'या' ९ ठिकाणांवर भारताचा एअर स्ट्राईक
Operation Sindoor
पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानमधील ९ ठिकाणावर बुधवारी (दि.७) एअर स्ट्राईक केला. या हल्ल्यात पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (PoK) मधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दल यांनी संयुक्तपणे चालवण्यात आलेले तिन्ही दलांचे हे 'ऑपरेशन सिंदूर' भारतीय भूमीवरून पार पाडण्यात आले.
पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सशस्त्र दलांनी लक्ष्य केलेली ९ ठिकाणे...
१. मरकझ सुभान अल्लाह बहवालपूर
२. मरकज तैयबा, मुरीदके
३. सरजल/ तेहरा कलान
४. मेहमूना जोया फॅसिलिटी, सियालकोट
५. मरकज अहले हदीथ बर्नाला, भिंबेर
६. मरकज अब्बास, कोटली
७. कोटली जिल्ह्यातील मस्कर रहील शाहिद
८. मुझफ्फराबादमधील शवाई नल्लाह कॅम
९. मरकज सयेदना बिलाल
या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी, जगाने दहशतवादाबद्दल झिरो टोलरन्स भूमिका घेतली पाहिजे, असे X वर पोस्ट करत म्हटले आहे.
Operation Sindoor | दहशतवाद्यांचे प्रमुख अड्डे उद्ध्वस्त
भारतीय हवाई दलांनी केलेल्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदच्या चार, लष्कर-ए-तोयबाच्या तीन आणि हिजबुल मुजाहिदीनचे दोन दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत.
बुधवारी पहाटे भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी ठिकाणांवर केलेल्या अचूक हल्ल्यांमध्ये सुमारे ८० दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती उच्च सुरक्षा सूत्रांनी दिली आहे.
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले होते. भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीन यांच्याशी संबंधित नऊ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, दोन सर्वात मोठे हल्ले जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख अड्डा असलेला बहावलपूर आणि मुरीदके येथे करण्यात आले. यात प्रत्येक ठिकाणी सुमारे २५ ते ३० दहशतवादी मारले गेले आहेत.

