

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमावर्ती राज्यांच्या मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक आणि मुख्य सचिवांसोबत बैठक घेतली. जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, सिक्कीम, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि लडाखचे उपराज्यपाल आणि जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल बैठकीत सहभागी झाले होते.
भारतीय लष्कराने पाकिस्तानवर हवाई हल्ले केल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपतींना लष्कराने सुरू केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' बद्दल माहिती दिली. दरम्यान, केंद्र सरकारने उद्या सकाळी ११ वाजता सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सरकारकडून राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि किरण रिजिजू उपस्थित राहणार आहेत.
ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने पाकिस्तानी दहशतवादी तळांवर केलेल्या कारवाईनंतर उद्भवलेल्या संवेदनशील परिस्थिती लक्षात घेता, पंतप्रधान मोदींनी नॉर्वे, क्रोएशिया आणि नेदरलँड्सचा त्यांचा दौरा रद्द केला आहे.
पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी (CCS) ची बैठक संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी ऑपरेशन सिंदूर नंतरच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा केली.
कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितले की, "पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना न्याय देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले होते. नऊ दहशतवादी छावण्यांना लक्ष्य करून नष्ट करण्यात आले.
विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सांगितले की, "पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर सुरू केले होते. नऊ दहशतवादी छावण्यांना लक्ष्य करण्यात आले आणि यशस्वीरित्या नष्ट करण्यात आल्या. नागरी पायाभूत सुविधांचे नुकसान टाळण्यासाठी आणि कोणत्याही नागरिकांचा जीवितहानी टाळण्यासाठी ही ठिकाणे निवडण्यात आली होती."
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री पत्रकार परिषदेत म्हणाले की, "पहलगाम हल्ल्याची जबाबदारी रेझिस्टन्स फ्रंट नावाच्या गटाने स्वीकारली आहे. हा गट लष्कर-ए-तैयबाशी जोडलेला आहे. या हल्ल्यात पाकिस्तानचे संबंध प्रस्थापित झाले आहेत."
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याशी चर्चा केली. अमित शहा जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल आणि बीएसएफचे महासंचालक यांच्याशी सतत संपर्कात आहेत. त्यांनी सीमावर्ती भागात राहणाऱ्या लोकांसाठी सर्व सुरक्षा उपाययोजना सुनिश्चित करण्याचे निर्देश बीएसएफच्या महासंचालकांना दिले आहेत
पहलगाम हल्ल्याचा बदला म्हणून भारताने पाकिस्तानच्या अनेक ठिकाणावर बुधवारी पहाटे (दि.७) एअर स्ट्राईक केला आहे. यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, "आपल्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. पहलगाममध्ये आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताने दिलेले ऑपरेशनसिंदूर हे प्रत्युत्तर आहे. भारत आणि त्याच्या लोकांवर होणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला योग्य उत्तर देण्याचा मोदी सरकारचा निर्धार आहे. भारत दहशतवादाला मुळापासून नष्ट करण्यासाठी दृढ आहे."
'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर त्यांचे बारकाईने लक्ष आहे आणि आशा आहे की ते लवकरच संपेल. शांततापूर्ण तोडग्यासाठी भारतीय आणि पाकिस्तानी नेतृत्वाशी चर्चा सुरूच राहील.
युएईचे परराष्ट्र मंत्री अब्दुल्ला बिन झायेद अल नाहयान यांनी भारत आणि पाकिस्तानला संयम राखण्याचे आवाहन केले आहे.
ऑपरेशन सिंदूरवर काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी "आमच्या सशस्त्र दलांचा अभिमान आहे. जय हिंद!" अशी प्रतिक्रिया दिली आहे.
ऑपरेशन सिंदूर नंतर राजस्थानमधील स्थानिकांनी जल्लोष करताना 'हिंदुस्तान झिंदाबाद' आणि 'भारत माता की जय' च्या घोषणा दिल्या.
भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदच्या चार, लष्कर-ए-तोयबाच्या तीन आणि हिजबुल मुजाहिदीनच्या दोन दहशतवादी अड्डे लक्ष्य करण्यात आले.
भारतीय सशस्त्र दलांनी बुधवारी पहाटे पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी छावण्यांवर केलेल्या अचूक हल्ल्यात ८० हून अधिक दहशतवादी ठार झाले, असे उच्च सुरक्षा सूत्रांनी सांगितले.
भारताने बुधवारी पहाटे दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केला या पार्श्वभूमीवर पंजाबमधील गुरूदासपूर येथील सर्व शाळा ७२ तासांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला.
1. मरकझ सुभान अल्लाह बहावलपूर २. मरकझ तैयबा, मुरीदके ३. सरजल / तेहरा कलान ४. मेहमूना जोया सुविधा, सियालकोट, ५. मरकज अहले हदीस बर्नाला, भिंबर, ६. मरकझ अब्बास, कोटली, 7. कोटली जिल्ह्यातील मस्कर राहील शाहिद, 8.मुझफ्फराबादमधील शवाई नाला कॅम ९. मरकज सय्यदना बिलाल
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या शुभम द्विवेदी यांच्या पत्नी म्हणाल्या, "माझ्या पतीच्या मृत्यूचा बदला घेतल्याबद्दल मी पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छिते. माझ्या संपूर्ण कुटुंबाचा त्यांच्यावर विश्वास होता आणि त्यांनी पाकिस्तानला ज्या पद्धतीने उत्तर दिले, त्यामुळे त्यांनी आमचा विश्वास जिवंत ठेवला आहे. हीच माझ्या पतीला खरी श्रद्धांजली आहे. माझे पती कुठेही असले तरी आज ते शांततेत असतील."
पाकिस्तान म्हटले आहे की, ६ ठिकाणी हल्ला झाला, त्यात ८ लोक ठार झाले आहेत.
ऑपरेशन सिंदूरनंतर, जम्मूचे विभागीय आयुक्त म्हणाले की, सध्याच्या परिस्थिती लक्षात घेता, जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछमधील सर्व शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था आज बंद राहतील.
ऑपरेशन सिंदूरची सविस्तर माहिती सकाळी १० वाजता दिली जाणर आहे. भारताच्या दहशतवादाविरुद्धच्या हल्ल्याची माहिती पत्रकार परिषदेद्वारे दिली जाईल.
भारतीय सैन्याने यशस्वीरित्या लक्ष्य केलेल्या नऊ ठिकाणांपैकी चार पाकिस्तानात आणि पाच पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्याचे सूत्रांनी सांगितले. पाकिस्तानमधील बेसमध्ये बहावलपूर, मुरीदके आणि सियालकोट यांचा समावेश आहे. दहशतवादी छावण्यांना लक्ष्य करण्यासाठी विशेष अचूक शस्त्रे वापरली गेली. तिन्ही सैन्याने संयुक्तपणे ही कारवाई केल्याचेही सूत्रांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः रात्रभर ऑपरेशन सिंधूवर सतत लक्ष ठेवून आहेत. भारतीय सैन्याने सर्व नऊ लक्ष्यांवर हल्ला यशस्वी केला आहे. भारतातील दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्यात भूमिका बजावणाऱ्या जैश ए मोहम्मदला लक्ष्य करण्याच्या उद्देशाने भारतीय सैन्याने हल्ल्यांसाठी हे ठिकाण निवडले होते.
सहा वर्षांपूर्वी भारताने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता. १४ फेब्रुवारी २०१९ हा दिवस भारत कधीही विसरू शकत नाही, पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात आपले ४० सीआरपीएफ जवान शहीद झाले आणि संपूर्ण देश संतापला होता. प्रत्येक भारतीयाला पाकिस्तानकडून सूड हवा होता, १२ दिवसांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानची सीमा ओलांडली आणि बालाकोटमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.
Operation Sindoor Live Updates | भारताने पाकिस्तान आणि पीओकेमध्ये हवाई हल्ले करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. १५ दिवसांनंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय सैन्याच्या या कारवाईनंतर पाकिस्तान सीमेवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी संरक्षण तुकड्या सक्रिय करण्यात आल्या आहेत. प्रत्येक क्षणाचे अपडेट्स जाणून घ्या...