India@75: ‘या’ घोषणेनंतर साने गुरुजींनी घेतली होती स्वातंत्र्य लढ्यात उडी

India@75:  ‘या’ घोषणेनंतर साने गुरुजींनी घेतली होती स्वातंत्र्य लढ्यात उडी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन:  साने गुरूजी उत्तम शिक्षक तरी होते,पण आपल्या हातून काहीच घडत नाही, याची अंत:करणाला रूखरूख लागत. देशासाठी आपला देह कारणी लागत नाही, देशसेवा करण्याची संधी मिळत नसल्याची खंत मात्र त्‍यांना सदैव वाटत होती. आपण इथे या शाळेच्या कामातच बुडून जाणार का? बाहेर स्वातंत्र्यलढा सुरू आहे, त्यात आपण नाही का उडी घेणार? अशा मनस्थितीत असतानाच १९३० साल उजाडले. ३१ डिसेंबर १९२९ च्या मध्यरात्री कॉग्रेसच्या लाहोर अधिवेशनात भाषण करताना पंडित नेहरूंनी "संपूर्ण स्वातंत्र्य मिळवणे हेच आपले ध्येय" अशी घोषणा करताच देशभरातील युवकांमध्ये नवचैत्यन्य उसळले. संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा साने गुरूजींच्या वाचनात आली आणि ते हर्षभरित झाले. यानंतर ते छात्रालयातील आपल्या खोलीत मुलांबरोबर अक्षरश: आनंदाने नाचू लागले. याच आनंदाच्या उर्मित त्यांनी

मंगल मंगल त्रिवार मंगल
पावन दिन हा धन्य अहो
भारत प्यारा स्वातंत्र झाला
जय बोला, जय बोला हो…..
अशा उत्तुंग कल्पनाविलासात रंगत मुक्त जयजयकारातच स्वातंत्र्याचे गीत रचले होते.

स्वातंत्र्याचा पहिला संस्कार

सामाजिक कार्याचे बाळकडू हे साने गुरुजींना शाळेतूनच मिळाले हाेते. त्यांनी म्युनिसिपालटीच्या वतीने होणाऱ्या खानेसुमारीच्या कार्यात स्वयंसेवक म्हणून काम केले होते. यादरम्यान त्यांनी डॉ. ॲनी बेझंट, चित्तरंजन दास, मोतीलाल घोष, बिपिनचंद्र पाल या देशभक्तांची तेजस्वी आणि स्फूर्तिदायी भाषणे ऐकण्‍याची संधी मिळाली. दरम्यान, साने गुरूजी मुंबईला सुट्टीसाठी गेले हाेते. संध्याकाळी चौपाटीवर स्वामी श्रध्दानंद यांच्‍या स्‍मरणार्थ दुखवटा सभेचे आयाेजन करण्‍यात आले हाेते. त्‍यावेळी पहिल्यांदाच गुरुजींनी महात्मा गांधी पाहिले होते. भारताचा आत्मा, पुण्याई, तप आणि वैराग्य चालतीबोलती गीता, सत्यप्रेमाचा नवा अवतार पाहिल्याची भावना त्‍यांच्‍या मनात झाली. हा सानेगुरूजींचा मनावर स्वातंत्र्याचा झालेला हा पहिला संस्कार होता. मुलांना शिकवता शिकवता, त्यांच्यावर संस्कार करता करता साने गुरूजींनी ईश्वरचंद्र विद्यासागर, रविंद्रनाथ टागोर यांसारख्या व्यक्तींची चरित्रेदेखील वाचली. या चरित्रकार्यातून त्यांनी प्रेरणा घेत स्वातंत्र्यलढ्याचा विचार पक्का होत गेला.

कॉलेजला असतानाही घेतली होता स्वातंत्र्य लढ्यात उडी

१९२०-२१ मध्ये महात्मा गांधींनी ब्रिटीशांविरूद्ध असहकार चळवळीचा नारा दिला. गांधीजींच्या हाकेला साद देत, अनेकांनी आपआपले व्यवसाय सोडून स्वातंत्र्यलढ्यात उडी घेतली.  सानेगुरूजींनाही कॉलेजला रामराम ठोकला अन् वडिलांना पत्र लिहित कळवले, "तुमचा एक मुलगा देशासाठी फकीर झाला असे समजा." हे पत्र मिळताच त्यांचे वडिल भाऊराव पुण्याला धावत आले आणि त्यांना पुष्कळ समाजवले. प्रो.द.वा. पोतदार यांनीही सानेगुरूजींना असाच सल्ला दिला. त्यानंतर गुरूजींनी पुन्हा शिक्षणाला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी १९२२ मध्ये ऑनर्स आणि मराठी या विषयातून बी.ए पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी अमळनेर येथील तत्वज्ञान मंदिरात एम.एसाठी  प्रवेश घेतला. येथील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते अंमळनेर येथील खानदेश एज्युकेशन सोसायटीमध्ये शिक्षक म्‍हणून रुजू झाले.

अंमळनेर सभेनंतर पहिल्यांदा तुरूंगवास

या सभेमध्ये सानेगुरूजींची वाणी साम्राज्यशाहीवर अग्निवर्षाव करत होती. विदेशी मालावर बहिष्कार टाकण्याची कळकळीची मागणी त्यांनी यावेळी केली. ही सभा संपताच गुरूजींना अटक झाली. त्यांना धुळे तुरूंगात पाठविण्याच आले.गुरूजी स्वत:ला कोणी राजकीय नेता समजत नसत तर, ते म्हणत मी प्रेम धर्माचा, बंधुतत्वाचा प्रचारक बनेन.

ब्रिटीश साम्राज्याचा निषेध

शिरोड्याच्या मिठाच्या सत्याग्रहावेळी अंमळनेर येथील मल्हारी चिकाटे या युवकाने पराक्रम गाजवला होता. या सत्याग्रहात पोलिसांच्या लाठ्या अंगावर घेत तो गंभीर जखमी झाला. यानंतर महाराष्ट्र सत्याग्रह मंडळाने त्याला कॅप्टन ही पदवी बहाल करत त्याचा गौरव केला होता. यावेळी गुरूजींनी मल्हारीचा रक्ताने माखलेला सदरा सभेत आणत तो जनतेला दाखवत त्याचा लिलाव पुकारला होता. या घटनेतून साने गुरूजींना ब्रिटीश साम्राज्याचा निषेध केला होता.

कट

 संदर्भ :  महाराष्‍ट्राचे शिल्‍पकार साने गुरुजी  लेखक : राजा मंगळवेढेकर

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news