India@75 : भारताचा तिरंगा स्वातंत्र्याचे प्रतीक : पंडित जवाहरलाल नेहरू | पुढारी

India@75 : भारताचा तिरंगा स्वातंत्र्याचे प्रतीक : पंडित जवाहरलाल नेहरू

पुढारी ऑनलाईन डेस्क :  २२ जुलै १९४७ रोजी स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजासंबंधी घटना परिषदेत पंडित जवाहरलाल नेहरूंनी ठराव मांडला होता, त्यावेळी ते म्हणाले होते, “या घटकेला माझ्या अंतःकरणात ज्या भावना उचंबळून आल्या आहेत त्याच सभागृहातील बऱ्याच सभासदांच्या अंतःकरणात उचंबळून आल्या असतील, अशी माझी खात्री आहे. कारण जो ठराव व जो ध्वज सभागृहाला सादर करण्याचे भाग्य मला लाभले आहे त्याच्यामागे राष्ट्राच्या जीवनाच्या एका लहानशा कालखंडाचा इतिहास उभा आहे.

“कधी कधी लहानशा कालखंडातच आपल्याला अनेक शतकांचा अनुभव प्राप्त होतो. आपल्या या महान राष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यातील आशानिराशांचे क्षण माझ्या आठवणीत आहेत. आपण या ध्वजाकडे केवळ अभिमानाने व उत्साहाने बघत नव्हतो तर, या ध्वजामुळे आपल्या नसानसांतून कसे चैतन्य वाहत होते व कधी कधी आपली मने, निराशा व निरुत्साह यांनी ग्रासली गेली असताना, या ध्वजाच्या दर्शनाने आपल्याला पुन्हा धडाडीने आगेकूच करण्याची प्रेरणा कशी मिळत होती, याची मला आठवण होते”, असेही नेहरु म्‍हणाले हाेते.

स्वातंत्र्याचे प्रतीक : पं. जवाहरलाल नेहरू

“जो ध्वज सादर करण्याचे भाग्य मला लाभले आहे तो ध्वज कोणत्याही साम्राज्याचे, साम्राज्यवादाचे किंवा कोणावरही प्रभुत्व स्थापन करण्याचे प्रतीक नाही तर स्वातंत्र्याचे, केवळ आपलेच स्वातंत्र्य नव्हे तर जे जे लोक हा ध्वज पाहतील त्या त्या सर्व लोकांच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे, असा माझा विश्वास आहे. हा ध्वज जेथे जेथे जाईल आणि तो अत्यंत दूरवरच्या देशांपर्यंत जाईल, अशी मला आशा वाटते. त्या त्या देशांकडे तो स्वातंत्र्याचा वा मैत्रीचा संदेश घेऊन जाईल; जगातील प्रत्येक देशाचा मित्रभाव संपादन करण्याची व स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या कोणत्याही देशाला मदत करण्याची भारताची इच्छा आहे, असा संदेश घेऊन जाईल. “, असेही स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजासंबंधी घटना परिषदेत नेहरु म्‍हणाले हाेते.

हेही वाचलंत का?

Back to top button