

Operation Sindoor : दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराचे व्हिडीओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर समोर आली असून, त्यामध्ये अनेक पाकिस्तानी लष्कर अधिकारी व कर्मचारी उपस्थित असल्याचे दिसून आले. रविवारी (दि. ११ मे) भारताने पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असणार्या पाकिस्तानी लष्करी व पोलिस अधिकाऱ्यांची नावे जाहीर केली. पाकिस्तान वारंवार दावा करत आला आहे की तो कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला आश्रय देत नाही, परंतु भारतीय सशस्त्र दलांनी प्रसिद्ध केलेल्या प्रतिमांनुसार, पाक लष्कराचे अनेक अधिकारी दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित होते.
७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने अचूक लक्ष्यभेद करत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. सोशल मीडियावर भारताच्या धडक कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्काराचे व्हिडीओ व फोटो समोर आले आहेत. हे अंत्यसंस्कार सीमेच्या विविध भागांमध्ये झाले असून, त्यामध्ये पाक लष्कराचे अधिकारी व पोलिस कर्मचारी सहभागी असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तान वारंवार दावा करत आला आहे की,कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाला आश्रय देत नाही; परंतु भारतीय सशस्त्र दलांनी पुन्हा एकदा पुरावा सादर केला आहे.
दहशतवाद्यांच्या अत्यंयात्रेत लाहोरच्या IV कोरचे कमांडर लेफ्टनंट जनरल फैयाज हुसेन शाह, लाहोरच्या 11व्या इन्फंट्री डिव्हिजनचे अधिकारी मेजर जनरल राव इम्रान सरताज, ब्रिगेडियर मोहम्मद फुरकान शब्बीर, पंजाब पोलिसांचे महानिरीक्षक (आयजी) डॉ. उस्मान अन्वर, पंजाब प्रांतिक विधानसभेचे आमदार मलिक सोहेब अहमद भेर्थ या सर्वांनी लाहोरजवळील मुरिदके येथील दहशतवादी तळावर भारताने केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्या तिघा दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते, असे भारतीय सशस्त्र दलांनी स्पष्ट केले आहे. यावेळी बंदी घालण्यात आलेल्या जमात-उद-दावा (JuD) संघटनेचे सदस्यही उपस्थित होते. भारताने केलेल्या कारवाईत ठार झालेला दहशतवादी अब्दुल मालीक, खालिद आणि मुदस्सिर हे जैश-ए-मुहम्मद संघटनेत होते.
अंत्यसंस्कारानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये मुरिदके येथे पाकिस्तान लष्कराचे जवान दहशतवाद्यांचे पाकिस्तानी ध्वजात लपेटलेले शवपेट्या वाहून नेत आहेत. भारताने पाकिस्तानच्या या कृतीचा तीव्र निषेध केला आहे. दहशतवाद्यांना "राजकीय सन्मान" देणे पाकिस्तानमध्ये सराव झाला आहे का, असा सवालही भारताने केला होता. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री यांनी पत्रकार परिषदेत एक छायाचित्र दाखवत म्हटले की, ज्यामध्ये पाकिस्तानी लष्करी व पोलिस अधिकारी मृत दहशतवाद्यांच्या शवांसमोर प्रार्थना करताना दिसत आहेत, हे चित्र काय संदेश देते? असा सवाल करत भारतीय हल्ल्यांमध्ये नागरिक मारले गेले, या दाव्याचा त्यांनी भंडाफोड केला होता.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. यानंतर दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला. सलग दोन दिवस भारताने दिलेल्या तडाख्यानंतर पाकिस्तानचे कबंरड मोडलं आहे. यानंतर शनिवारी सायंकाळी पाकिस्तानने शस्त्रसंधी मान्य केली. मात्र हे अवघ्या काही तासांमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आपले 'नापाक' हल्ले सुरु ठेवले आहेत. भारतानेही या हल्ल्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे.