IAS officer Divya Mittal: १३ वर्षांच्या सेवेनंतर IAS अधिकारी दिव्या मित्तल यांचा राजीनामा; कारण काय? भावनिक पोस्ट व्हायरल

देवरिया येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत राहिलेल्या IAS अधिकारी दिव्या मित्तल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
IAS officer Divya Mittal
IAS officer Divya MittalFile Photo
Published on
Updated on

IAS officer Divya Mittal

गोरखपूर : उत्तर प्रदेशातील आयएएस अधिकारी दिव्या मित्तल यांनी नागरी सेवेचा राजीनामा दिला आहे. त्या महसूल विभागात विशेष सचिव म्हणून कार्यरत होत्या. तब्बल १३ वर्षांच्या सेवेनंतर त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिल्याची माहिती सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. आपल्या निर्णयाची घोषणा करताना त्यांनी लिहिले, "आज कृतज्ञतेने माझे डोळे भरून आले आहेत. माझ्या डोळ्यांसमोर केवळ एकच दृश्य ठळकपणे उभे राहत आहे. मी पद सोडले असले तरी माझे स्वप्न सोडणार नाही जे मला या देशाच्या मातीने दिले आहे."

IT दिल्ली आणि IIM बेगळूर येथे शिक्षण घेतलेल्या दिव्या मित्तल यांनी, आपल्या इच्छेने या प्रशासकीय प्रवासाला विराम दिल्याचे म्हटले आहे. दिव्या यांनी मुख्य सचिव एस. पी. गोयल यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. त्यांनी रविवारी सकाळी फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील पोस्टद्वारे या निर्णयाची घोषणा केली. २०१३ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असलेल्या दिव्या यांनी मिर्झापूर आणि देवरिया येथे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यांचे पती गगनदीप सिंग हे देखील आयएएस अधिकारी आहेत.

दिव्या मित्तल यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “आज मी १३ वर्षांच्या अविस्मरणीय प्रवासाला स्वतःच्या इच्छेने विराम देत IAS पदाचा राजीनामा दिला आहे.” साध्या परिस्थितीत वाढताना त्यांनी चांगले आणि यशस्वी आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहिले होते. दिवस-रात्र मेहनत करून IIT दिल्ली आणि IIM बेगळूर येथून शिक्षण घेतल्यानंतर त्यांना लंडनमध्ये नोकरी मिळाली. मात्र, आयुष्यात सर्व काही मिळूनही काहीतरी अपूर्ण असल्याची भावना मनात होती, असे त्यांनी सांगितले.

IAS officer Divya Mittal
Mohan Bhagwat: "भारतात मुस्लिम नकोत म्हणणारा हिंदू असूच शकत नाही": न्यूयॉर्कमधील कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान

“आपल्या देशापासून दूर असल्याची खंत होती. माझे शिक्षण, आत्मविश्वास आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात ताठ मानेने उभे राहण्याची ताकद या मातीचे माझ्यावर असलेले ऋण होते. ते ऋण फेडायचे होते,” असे त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले.

आपण ज्या भारताचे स्वप्न पाहिले, तो भारत घडविणाऱ्या प्रयत्नांमध्ये आपलेही योगदान असावे, अशी इच्छा होती. त्यामुळे त्या भारतात परतल्या आणि IAS अधिकारी होण्याची संधी मिळाली. या सेवेतून अनेक गोष्टी करण्याची संधी मिळाली आणि खूप काही शिकता आले, असे त्यांनी म्हटले.

देवरियाने आपल्याला योग्य गोष्टीच्या बाजूने उभे राहणे हा पर्याय नसून कर्तव्य आहे, हे शिकवले. तर मिर्झापूरने अशक्य ही वस्तुस्थिती नसून केवळ एक मत आहे, हे शिकवले, असे दिव्या मित्तल यांनी सांगितले. “स्वतःसाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण झाली होती. आता आपल्या लोकांसाठी पाहिलेली स्वप्ने जगायची होती,” असे त्यांनी लिहिले आहे.

या सेवाकाळातील खरा आनंद कोणत्या क्षणी मिळाला, हे सांगताना त्यांनी भूमिहक्क मिळालेल्या कुटुंबाचा, सन्मानाने जगण्याची संधी मिळालेल्या दिव्यांग व्यक्तीचा आणि शेताला पाणी मिळालेल्या शेतकऱ्याचा उल्लेख केला. त्यांच्या संघर्षात सहभागी होताना सरकारी फाईलमागे एक व्यक्ती असते आणि तिची प्रतिष्ठा जपणे हाच न्याय आहे, ही शिकवण मिळाल्याचे त्यांनी म्हटले. “मी काही देण्यासाठी आले होते, असा विचार करणे ही माझीच चूक होती. सत्य हे आहे की सर्वाधिक मला मिळाले आणि त्यामुळे माझे ऋण आणखी वाढत गेले,” असेही त्यांनी भावनिकपणे म्हटले आहे.

आपण थकलेल्या किंवा खचलेल्या असतानाही लोकांनी त्याच विश्वासाने आपल्याकडे पाहिले आणि त्यामुळे पुढे जाण्याचे बळ मिळाले, असे दिव्या मित्तल यांनी सांगितले. “इतके प्रेम, सन्मान आणि आपलेपणा मिळाला की माझी झोळी पूर्ण भरून गेली,” असे त्यांनी म्हटले. आपल्या सहकाऱ्यांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले. त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केले आणि प्रत्येक वेळी साथ दिली, असे त्यांनी नमूद केले.

पोस्टच्या शेवटी त्यांनी लहुरिया दहच्या डोंगरावरील एका वृद्ध महिलेचा भावनिक प्रसंग सांगितला आहे. गावात पहिल्यांदा पाणी पोहोचल्याचे पाहून त्या आजीने काहीही न बोलता थरथरत्या हातांनी दिव्या मित्तल यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला होता. “पद आज सोडले, पण तो स्पर्श आयुष्यभर विसरणार नाही. आणि या देशाच्या मातीने दिलेले ते स्वप्नही कधी सोडणार नाही,” असे त्यांनी म्हटले आहे. दिव्या मित्तल यांची ही भावनिक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

IAS officer Divya Mittal
September Rules change: १ सप्टेंबरपासून बदलणार ७ मोठे नियम; 'ही' कामे त्वरित पूर्ण करा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news