

West Bengal Election Result: पश्चिम बंगाल मधील विधानसभा निवडणुकीत यावेळी मोठा बदल झाला आहे. तब्बल 15 वर्षे सत्तेत राहिलेल्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेससमोर भाजपने (BJP) जोरदार आव्हान उभं करत ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे. 2011 मध्ये ‘मां, माटी, मानुष’ या घोषणेवर सत्ता मिळवणाऱ्या ममतांच्या कारकिर्दीनंतर आता पुन्हा ‘परिवर्तना’ची लाट बंगालमध्ये दिसू लागली आहे.
ममता बॅनर्जी यांनी 34 वर्षांच्या डाव्या सत्तेला भ्रष्टाचार, बेरोजगारी, कायदा-सुव्यवस्था आणि हिंसाचाराच्या मुद्द्यांवर पराभूत केले होते. मात्र 15 वर्षांनंतर हेच मुद्दे त्यांच्या विरोधात गेले. राज्यात उद्योग, गुंतवणूक आणि रोजगाराच्या संधी कमी झाल्याचा आरोप करत भाजपने विकासाचा मुद्दा आक्रमकपणे पुढे केला. “बंगाल पुन्हा उभा करू” या घोषणेला मतदारांनी प्रतिसाद दिला.
शिक्षक भरती घोटाळा, आरजी कर प्रकरणासारख्या घटनांनी सरकारवरील विश्वास डळमळीत झाला. भ्रष्टाचार, कुटुंबवाद आणि ‘सिंडिकेट राज’ हे मुद्दे भाजपने प्रभावीपणे मांडले. राजकीय विश्लेषक पार्थ मुखोपाध्याय यांच्या मते, “राज्यातील लोकशाही कमकुवत झाली होती, विरोधी पक्षांना वाव नव्हता,” ही भावना मतदारांमध्ये निर्माण झाली होती.
ममतांची मुख्य ताकद मानले जाणारे मुस्लिम मतदार यावेळी विभागले गेले. मालदा, मुर्शिदाबाद, उत्तर व दक्षिण 24 परगणा या मुस्लिमबहुल जिल्ह्यांमध्ये भाजपची ताकद वाढली. काही ठिकाणी स्थानिक नेत्यांच्या प्रभावामुळे मुस्लिम मतांमध्ये फूट पडली, ज्याचा थेट फायदा भाजपला झाला.
अनुसूचित जाती-जमाती, मतुआ समाज आणि उत्तर बंगालमधील चहा कामगारांनी BJPला मोठ्या प्रमाणात साथ दिली. जंगलमहल आणि दक्षिण बंगालमध्येही भाजपने आपली पकड मजबूत केली. यामुळे टीएमसी चा पारंपरिक गड भेदण्यात भाजप यशस्वी झाला.
ममता सरकारने लक्ष्मी भंडार, स्वास्थ्य साथी, युवा साथी यांसारख्या योजना राबवल्या होत्या. तरीही महिलांचा कल यावेळी भाजपकडे वळल्याचे दिसले. भाजपने महिलांना 3000 रुपयांची मदत आणि मोफत बस प्रवासाचे आश्वासन दिले, ज्याचा प्रभाव मतांवर पडला.
भाजपने या निवडणुकीपूर्वी संघटनात्मक पातळीवर मोठे बदल केले.
शामिक भट्टाचार्य यांची राज्याध्यक्षपदी नियुक्ती करून ‘भद्रलोक’ मतदारांशी संपर्क साधला.
ग्रामीण भागात सुवेंदू अधिकारी हे चेहरा म्हणून पुढे आले.
दिलीप घोष आणि राहुल सिन्हा यांसारख्या जुन्या नेत्यांना पुन्हा सक्रिय करून पक्षाने एकजूट दाखवली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांमध्ये सर्व वरिष्ठ नेत्यांना पुढे करून मजबूत संघटनेचा संदेश दिला.
टीएमसी ने भाजपला ‘बाहेरचा पक्ष’ म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला होता. याला उत्तर देताना भाजपने बंगाली संस्कृतीशी जवळीक दाखवली. नेत्यांनी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मासे खाण्याचे प्रदर्शन करत “आम्ही बंगालच्या संस्कृतीत हस्तक्षेप करणार नाही” असा संदेश दिला.
2021 मध्ये बूथ पातळीवर भाजप कमकुवत होता. यावेळी पक्षाने यावर भर दिला.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वाखाली बूथ वर्कर्सचे नेटवर्क मजबूत करण्यात आले.
पोलिंग एजंट निवडण्यासाठी लेखी आणि तोंडी परिक्षा घेण्यात आल्या.
ग्रामीण भागात मतदारांना मतदान केंद्रांपर्यंत आणण्यासाठी विशेष मोहीम राबवली.
मतदार यादीतून बनावट नावे वगळणे, 700 हून अधिक केंद्रीय सुरक्षा दलांची तैनाती, अधिकाऱ्यांच्या नियुक्तीत केलेले बदल यामुळे मतदान अधिक निष्पक्ष झाल्याची भावना निर्माण झाली. याचा फायदा BJPला झाला.
एकेकाळी केवळ एक आमदार आणि दोन खासदार असलेला भाजपा आता बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्याच्या उंबरठ्यावर आहे. मुस्लिम, महिला, SC-ST आणि ग्रामीण मतदारांमध्ये वाढलेला पाठिंबा, मजबूत संघटन आणि ममता सरकारविरोधातील अँटी-इन्कम्बन्सी, या सर्व घटकांमुळे भाजपला हा ऐतिहासिक विजय मिळाला आहे.
बंगालच्या राजकारणात हे केवळ सत्तांतर नाही, तर राजकीय समीकरणांमध्ये झालेला मोठा बदल आहे. पुढील काळात या बदलाचा प्रभाव केवळ राज्यापुरता मर्यादित न राहता राष्ट्रीय राजकारणावरही पडण्याची शक्यता आहे.