नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि गोंधळाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती गठित केली जाणार असल्याची घोषणा केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी गुरूवारी (दि.२०) पत्रकारपरिषदेत केली. ही समिती राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या कामकाजाचा आढावा घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले की, उच्चस्तरीय समिती एनटीएची रचना, कार्यपद्धती, परीक्षा प्रक्रिया, पारदर्शकता आणि डेटा सुरक्षा प्रोटोकॉलमध्ये आणखी सुधारणा करण्यासाठी शिफारशी करणार आहे. या प्रकरणात समितीला एनटीए दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल. सरकार विद्यार्थ्यांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. सरकारकडून कोणतीही अनियमितता किंवा गैरप्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
बिहारमध्ये नीट परिक्षा प्रकरणी झालेल्या गोंधळाचा पाटणा पोलीस तपास करीत आहेत. याबाबतचा अहवाल लवकरच केंद्र सरकारला प्राप्त होणार आहे. प्राथमिक माहितीवरून पेपरफुटी आणि अनियमिततेचा प्रकार हा केवळ एका विशिष्ट प्रदेशापुरता मर्यादित होता, असा खुलासाही प्रधान यांनी केला.
नेट परीक्षेचा फुटलेल्या पेपरची प्रश्नपत्रिका मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे स्पष्ट होताच, केंद्रसरकारने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रधान यांनी दिली.
हेही वाचा :