NEET scam
NEET scam

NEET Cases : नीट गोंधळप्रकरणी हायकोर्ट सुनावणीला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

Published on

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : NEET Cases : नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी व गोंधळप्रकरणी देशातील विविध उच्च न्यायालयांत दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणीला स्थगिती देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी (दि. 20) दिला आहे. तथापि, वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या समुपदेशनावर (काऊन्सेलिंग) स्थगिती देण्यास मात्र, सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा नकार दिला आहे.

स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेसह ४९ विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती एस.व्ही.एन भाटी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीची सीबीआय चौकशी करून ६२० पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीसंदर्भात देशातील ७ उच्च न्यायालयांमध्ये दाखल झालेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय चाचणी संस्थेनेही (एनटीए) याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी करताना खंडपीठाने गेल्या आठवड्यात केंद्र सरकार आणि एनटीएला नोटीस बजावली होती.

खंडपीठाने नोटीस बजावल्यानंतरही उच्च न्यायालयांमध्ये नीटप्रकरणी सुनावणी सुरूच असल्याची बाब एनटीएचे वकील वर्धमान कौशिक यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिली. खंडपीठाने याबाबत दखल घेऊन राजस्थान, कोलकाता आणि मुंबई उच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीला स्थगिती दिली.

'त्या' विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेचे प्रवेशपत्र जारी

एनटीएने ग्रेस गुण दिलेल्या १५६३ विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा २३ जून रोजी घेण्यात येणार असल्याचे एनटीएने न्यायालयात सांगितले होते. त्यानुसार सर्व विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र जारी करण्यात आले असून फेरपरीक्षेचा निकाल ३० जून रोजी जाहीर केला जाणार असल्याची माहिती एनटीएने न्यायालयात दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news