

Gyanesh Kumar EC Transfers: मतदार यादी SIR वरून संपूर्ण देशात वादंग माजलं आहे. त्या दरम्यान, निवडणूक आयोगाने आपल्या प्रशासकीय रचनेत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यास सुरूवात केली आहे. वर्ष २०२५ आणि २०२६ मध्ये राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात जवळपास १८ ते २० मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी फेब्रुवारी २०२५ मध्ये पद ग्रहण केलं होतं. त्यानंतर २० महिन्यात अधिकाऱ्यांच्या बदलांची एवढी मोठी मोहीम पहिल्यांदाच राबवली जात आहे.
द इकॉनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या रिपोर्टनुसार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांसोबतच निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची विशेष करून उप निवडणूक आयुक्तांच्या (DEC) स्तरावरील अधिकाऱ्यांमध्ये देखील मोठा बदल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही वर्षात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बदली होत असते. मात्र २०२५ - २६ या दरम्यान अपेक्षेपक्षा जास्त प्रमाणात या बदल्या झाल्या आहेत.
फेब्रुवारी २०२५ पासून आतापर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळातील सुरूवातीच्या २० महिन्यात जवळपास १८ ते २० मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. मे २०२२ ते फेब्रुवारी २०२५ माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या ३३ महिन्याच्या कार्यकाळात जवळपास २३ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बदली झाली होती. या काळात २०२४ ची लोकसभा निवडणूक झाली होती.
यापूर्वीच्या पहिल्या ४१ महिन्यात मुख्य निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा आणि सुशील चंद्रा यांच्या कार्यकाळात जवळपास २९ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. यावेळी देखील लोकसभा निवडणूक झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीदरम्यान सहसा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची बदली केली जाते. मात्र २०२५ आणि २०२६ मध्ये अधिकाऱ्यांच्या बदलीचा वेग फारच वाढला आहे.
निवडणूक आयोगात सहसा प्रशासकीय सोयीसाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना किमान ३ वर्षे एकाच पदावर ठेवलं जातं. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार आता झालेल्या बदल्यांमध्ये किमान सात अधिकारी असे आहेत ज्यांना एका पदावर दोन वर्षापेक्षाही कमी काळ झाला आहे मात्र त्यांची बदली झाली आहे. २०२५ मध्ये आठ ते ९ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांचे मुख्य निवडणूक अधिकारी बदलले गेले आहेत. त्यानंतर २०२६ मध्ये आतापर्यंत किमान १० अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.
रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार २०२५ मध्ये मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या बदल्यांची सुरूवात ही बिहारपासून सुरू झाली आहे. SIR प्रक्रिया राबवण्यात आलेलं बिहार हे पहिलं राज्य आहे.