Google Gemini
नवी दिल्ली : आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासोबतच त्यांचे पैसेही वाचवत आहे. गुगलच्या Gemini AI मॉडेलने एका व्यक्तीचे १४,५०० रुपये वाचवले आहेत. एक्सवर एका युजरने पोस्ट करत ही माहिती शेअर केली आहे. गुगल जेमिनीने त्याचे पैसे वाचवले आणि मोबाईल सर्व्हिस सेंटर लोकांची कशी फसवणूक करतात, हे देखील समोर आणले. जाणून घ्या नेमकं प्रकरण काय आहे?
आशुतोष श्रीवास्तव नावाच्या एका युजरने 'एक्स'वर सांगितले की, गुगल जेमिनीने त्याचे १४,५०० रुपये वाचवले आणि सॅमसंगचे अधिकृत सर्व्हिस सेंटर लोकांना कसे फसवतात, याची माहिती दिली.
आशुतोष याचा Samsung Galaxy A52s फोन खाली पडला होता. यामुळे स्क्रीन कधी-कधी काळी पडत होती आणि फोन सुरू होत नव्हता. तसेच फोनचा माइक आणि ऑक्स जॅकही काम करत नव्हता. फक्त चार्जिंग व्यवस्थित होत होते. याचा अर्थ फोन जवळपास पूर्णपणे निकामी झाला होता. त्याने फोन ज्या दुकानातून विकत घेतला होता तिथे नेला, तेव्हा दुकानदाराने तो सॅमसंगच्या सर्व्हिस सेंटरमध्ये पाठवला.
सर्व्हिस सेंटरने फोनची तपासणी केल्यावर सांगितले की, फोनचा मदरबोर्ड खराब झाला आहे. तो दुरुस्त करता येणार नाही, त्यामुळे संपूर्ण मदरबोर्ड बदलावा लागेल. यासाठी १६,००० रुपये खर्च सांगितला. मात्र, आपला फोन पूर्णपणे खराब झाला नसावा, अशी त्याला खात्री होती, कारण चार्जिंग व्यवस्थित होत होते. शंका आल्याने त्याने या समस्येबद्दल जेमिनीला विचारले.
जेमिनीने सांगितले की, ही मदरबोर्डची समस्या नाही. AI नुसार, फोनच्या खालच्या बोर्डला मदरबोर्डशी जोडणारी 'फ्लेक्स केबल' सैल झाली असावी किंवा खराब झाली असावी. तसेच डिस्प्ले कनेक्टर सैल झाल्यामुळे स्क्रीनची समस्या येत आहे. जेमिनीने त्याला एखाद्या स्थानिक रिपेअर दुकानात जाऊन सल्ला घेण्यास सांगितले आणि यासाठी जास्तीत जास्त ५०० ते १५०० रुपये खर्च येईल, असे सांगितले.
त्या व्यक्तीने आपल्या घराजवळील एका छोट्या रिपेअर शॉपमध्ये फोन दाखवला. तिथे त्याने जेमिनीने सांगितलेलीच माहिती दिली आणि 'फ्लेक्स केबल' व 'डिस्प्ले कनेक्टर' तपासण्यास सांगितले. फोन उघडून पाहिल्यावर तीच समस्या होती. फोन पडल्यामुळे फ्लेक्स केबल खराब झाली होती. दुकानदाराने ती केबल बदलली आणि सर्व्हिस चार्जसह एकूण खर्च फक्त १,४५० रुपये आला.