

Bengaluru news
बेंगळुरू: देशातील आयटी हब मानल्या जाणाऱ्या बेंगळुरूमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका ३४ वर्षीय मेकॅनिकला वेळेवर उपचार आणि रुग्णवाहिका न मिळाल्याने, तसेच वाटेत अपघात होऊनही कोणी मदतीला न धावल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला.
बालाजी नगर येथे राहणारे वेंकटरामणन यांना रात्री अचानक छातीत दुखू लागले. त्यांच्या पत्नीने त्यांना दुचाकीवरून रुग्णालयात नेले. मात्र, इथूनच त्यांच्या दुर्दैवाचा फेरा सुरू झाला. त्यांनी प्रथम एका खासगी रुग्णालयात धाव घेतली, पण डॉक्टर नाहीत असे सांगून त्यांना माघारी धाडले. त्यानंतर दुसऱ्या एका रुग्णालयात ईसीजी केल्यावर त्यांना सौम्य हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाले. इतकी गंभीर स्थिती असतानाही रुग्णालयाने ना प्राथमिक उपचार केले, ना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.
हताश झालेली पत्नी पतीला पुन्हा दुचाकीवर घेऊन पुढच्या रुग्णालयाकडे निघाली असता वाटेतच त्यांच्या गाडीला अपघात झाला. पती रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना पत्नी हात जोडून येणाऱ्या-जाणाऱ्यांकडे मदतीची याचना करत होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनेक वाहने न थांबता निघून जाताना दिसत आहेत. अखेर एका टॅक्सी चालकाने मदत केली. पण तोपर्यंत उशीर झाला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
मृत वेंकटरामणन यांच्या पश्चात पत्नी, ५ वर्षांचा मुलगा आणि १८ महिन्यांची मुलगी आहे. त्यांच्या वृद्ध आईने यापूर्वीच आपली पाच मुले गमावली असून आता शेवटच्या मुलाचाही आधार हिरावला गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अशा परिस्थितीतही या कुटुंबाने वेंकटरामणन यांचे डोळे दान करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे.