

Southwest monsoon 2025 Rain Prediction IMD
नवी दिल्ली : दक्षिण बंगालच्या उपसागरावर आणि दक्षिण अंदमान समुद्रावर नैऋत्य मान्सूनचे अधिकृत आगमन झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाकडून आज (दि.१३) करण्यात आली. नियोजित वेळेच्या किमान एक आठवडा आधीच मान्सून दक्षिण दक्षिण बंगालच्या उपसागरात आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झाला आहे.
हवामान बदलातून मान्सून आगमनाचा इशारा
भारतीय हवामान खात्याच्या माहितीनुसार, मान्सूनने आज अधिकृतपणे दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि उत्तर अंदमान समुद्राचा काही भाग व्यापलेला आहे. मागील ४८ तासांपासून काही भागांमध्ये जोरदार पावसाच्या घटनांनी आणि हवामानातील बदलांनी मान्सूनच्या आगमनाचा इशारा दिला होता.
निकोबार बेटांवर मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद
गेल्या २४ तासांत निकोबार बेटांवरील अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून 'या' बेटांवर हवामान बदल आणि सातत्याने दमदार पावसाचा अनुभव घेतला जात आहे.
दक्षिण बंगालच्या उपसागर, निकोबार बेटे व अंदमान समुद्र भागात पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांची तीव्रता आणि खोली सातत्याने वाढत आहे. 1.5 किमी उंचीवर वाऱ्याचा वेग 20 नॉट्सच्यावर असून काही भागात हे वारे 4.5 किमी उंचीपर्यंत पोहोचले आहेत.
पुढील 3-4 दिवसांत मान्सूनचा आणखी विस्तार शक्य
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, येत्या काही दिवसांत मान्सून दक्षिण अरबी समुद्र, मालदीव-कोमोरिन परिसर, संपूर्ण अंदमान-निकोबार बेटे आणि मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात अधिक विस्तारेल.
महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन कधी?
दरवर्षी महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन 6 जून रोजी होतं. कोकण पट्ट्यात पावसाच्या पहिल्या सरी कोसळतात. यंदा अंदमानमध्ये मान्सूनचं आगमन 8 ते 10 दिवस आधी झालं आहे. तर केरळमध्ये लवकर नैऋत्य मान्सून वारे पोहोचतील अशी शक्यता आहे. महाराष्ट्रात नेमकं कधी आगमन होईल याचा अंदाज लवकरच वर्तवला जाईल. सध्या आम्ही मान्सूनच्या वाटचालीवर लक्ष ठेवून आहोत, असे पुणे हवामानशास्त्र विभागाचे एस. डी. सानप यांनी सांगितले.