

FSSAI Food Safety Action: बाजारात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) प्रियागोल्ड बिस्किटे तयार करणाऱ्या सूर्या फूड अँड अॅग्रोसह आणखी दोन कंपन्यांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
बिस्किटांच्या निर्मितीत जनावरांसाठी वापरल्या जाणाऱ्या कोंड्याचा वापर केल्याचा आरोप सूर्या फूड अँड अॅग्रोवर आहे. तर डोडला डेअरीच्या दुधाच्या नमुन्यात डिटर्जंट आणि कॉस्टिक सोडा आढळल्याचे प्रयोगशाळेच्या तपासणीत समोर आले. याशिवाय, UEIR ऑरगॅनिक फूड्सच्या पिवळ्या मनुक्यांमध्ये कीटकनाशकांचे अंश आढळले आहेत.
प्रियागोल्ड बिस्किटांची निर्मिती करणाऱ्या सूर्या फूड अँड अॅग्रो कंपनीविरोधात ग्राहकाच्या तक्रारीनंतर FSSAI ने तपासणी केली. या तपासणीत बिस्किटे तयार करण्यासाठी जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कोंड्याचा वापर होत असल्याचे आढळले.
तपासणीदरम्यान कोंड्याच्या गोण्यांवर हा पदार्थ जनावरांच्या चाऱ्यासाठी असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. मात्र, या कच्च्या मालाचा वापर बिस्किटांच्या निर्मितीत होत असल्याचे तपासणीत समोर आले.
याशिवाय, उत्पादन केंद्रातील स्वच्छता, कीटक नियंत्रण, कच्च्या मालाची साठवणूक, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंची विभागणी आणि कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेबाबतही अनेक त्रुटी आढळल्या. उत्पादन प्रक्रियेदरम्यान तयार होणाऱ्या मिश्रणांची हाताळणी आणि परिसराच्या देखभालीतही नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आले.
या गंभीर त्रुटींमुळे FSSAI ने यापूर्वीच सूर्या फूड अँड अॅग्रोचा परवाना निलंबित केला होता. आता कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
दुसरीकडे, डोडला डेअरीच्या फुल क्रीम दुधाच्या गुणवत्तेबाबतही गंभीर बाब समोर आली आहे. कंपनीच्या दुधाचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला होता. सुरुवातीच्या तपासणीत दुधातील फॅटचे प्रमाण निर्धारित मानकांपेक्षा कमी असल्याचे आढळले. त्यामुळे हा नमुना निकृष्ट दर्जाचा घोषित करण्यात आला.
कंपनीने या निष्कर्षाला आव्हान दिल्यानंतर दुधाचा नमुना पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला. या प्रयोगशाळेच्या अहवालानुसार, दुधात डिटर्जंट आणि कॉस्टिक सोडा आढळल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे हा नमुना केवळ निकृष्ट दर्जाचा नसून असुरक्षित असल्याचेही स्पष्ट झाले.
दुधातील फॅटचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा कमी असल्याने त्याच्या गुणवत्तेवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत. या प्रकरणात अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ अंतर्गत नियमांचे उल्लंघन झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले.
यानंतर अधिकाऱ्यांनी डोडला डेअरीसह संबंधित उत्पादन प्रक्रियेशी जोडलेल्या अन्य खाद्य व्यावसायिकांविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यास मंजुरी दिली आहे.
UEIR ऑरगॅनिक फूड्स या कंपनीच्या पिवळ्या मनुक्यांच्या नमुन्यातही कीटकनाशकांचे अंश आढळले आहेत. त्यामुळे या उत्पादनाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणातही FSSAI ने गंभीर त्रुटींची दखल घेतली आहे.
FSSAI ने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे या तिन्ही कंपन्यांविरोधात खाद्य सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई सुरू केल्याची माहिती दिली आहे. बिस्किटे, दूध आणि मनुक्यांसारखे पदार्थ अनेक कुटुंबांच्या दैनंदिन आहाराचा भाग असतात. त्यामुळे या उत्पादनांची गुणवत्ता आणि सुरक्षितता महत्त्वाची आहे.