

अलिबाग: रायगड जिल्हा पर्यटन जिल्हा असून येथे दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना शुद्ध, दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, अन्नभेसळ होऊ नये यासाठी अन्न व औषध प्रशासन व ग्रामपंचायतींमार्फत प्रयत्न सुरु केले आहेत. यात कॉटेजेस व घरगुती खानावळ व्यावसायिकांना अन्नभेसळी संबंधी मार्गदर्शन करण्यात येत आहे.
अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या हजारो पर्यटकांना दर्जेदार आणि सुरक्षित जेवण मिळावे, यासाठी रायगड जिल्ह्यात पहिल्यांदाच नागाव ग्रामपंचायत आणि एफडीए अधिकाऱ्यांची हॉटेल व रिसॉर्ट व्यावसायिकांसोबत एक संयुक्त बैठक पार पडली.
नागाव ग्रामपंचायतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला एफडीएचे वरिष्ठ अधिकारी, नागावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि परिसरातील छोटे-मोठे हॉटेल चालक, रिसॉर्ट व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कलर आणि रसायनांवर बंदीबाबत माहिती देण्यात आली. जेवणात किंवा कोणत्याही पदार्थात आरोग्याला घातक ठरतील अशा कृत्रिम रंगांचा (कलर्स) वापर अजिबात करू नये हे सांगण्यात आले. चायनीज फूड, वडापाव किंवा इतर खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छतेचे आणि चांगल्या साहित्याचे नियम पाळावेत.
शिळे किंवा निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरू नये याबाबत अन्नपुरवठा विभागाचे अधिकारी माने यांनी मार्गदर्शन केले. यामुळे हॉटेल, कॉटेजेसमधील अन्न पदार्थांवर एफडीएची नजर राहणार आहे. या उपक्रमाला पर्यटन व्यावसायिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
ब्लू फ्लॅगच्या माध्यमातून नागाव हे पर्यटनस्थळ जागतिक स्तरावर पोहोचले असून, पर्यटकांचे आकर्षण बनत आहे. नागाव ग्रामपंचायत हद्दीतील फूड आणि टुरिस्ट इंडस्ट्रीमध्ये अन्नसुरक्षेबाबत जनजागृती होणे आवश्यक होते. तुकाराम मुंडे यांच्या पुढाकारामुळे या विषयाबाबत जागरूकता निर्माण झाली आहे.
अन्नपुरवठा विभागाने आयोजित केलेल्या चर्चासत्राचा व्यावसायिकांना नक्कीच फायदा होईल. कारवाई करण्यापेक्षा नियमांची माहिती देऊन जनजागृती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागावचे नाव बदनाम न होता ते नेहमी चांगल्या गोष्टींसाठी चर्चेत राहावे, हा ग्रामपंचायतीचा उद्देश आहे. - हर्षदा मयेकर, सरपंच, नागाव