

नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत मोफत धान्य मिळवणाऱ्या कोट्यवधी नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सरकारने आता रेशन कार्डसाठी ई-केवायसी (e-KYC) करणे अनिवार्य केले आहे.
जे नागरिक ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करणार नाहीत, त्यांना मिळणारे मोफत धान्य बंद होऊ शकते, इतकेच नाही तर रेशन कार्डमधून त्यांचे नावही वगळले जाण्याची शक्यता आहे. रेशन योजनेतील फसवणूक आणि गैरप्रकार रोखण्यासाठी सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे.
रेशन कार्ड हे केवळ मोफत धान्य मिळवण्यासाठीच नव्हे, तर एक महत्त्वाचे ओळखपत्र म्हणूनही वापरले जाते. आधार कार्ड, पॅन कार्ड यांसारख्या कागदपत्रांसाठी ओळख पडताळणीसाठी याचा उपयोग होतो. त्यामुळे योजनेचा लाभ केवळ पात्र आणि गरजू व्यक्तींपर्यंतच पोहोचावा, यासाठी सरकारने ई-केवायसी बंधनकारक केले आहे.
अनेक बनावट किंवा अपात्र नागरिक सरकारी योजनेचा लाभ घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. ई-केवायसीमुळे केवळ खऱ्या लाभार्थ्यांनाच धान्य मिळेल. यामुळे फसवणुकीला आळा बसेल.
सरकारी वितरणात पारदर्शकता आणणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
मृत व्यक्ती किंवा स्थलांतरित झालेल्या नागरिकांची नावे वगळून केवळ पात्र सदस्यांची अचूक नोंद ठेवणे शक्य होईल.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, रेशन कार्डमध्ये समाविष्ट असलेल्या प्रत्येक सदस्याला ही प्रक्रिया स्वतंत्रपणे पूर्ण करावी लागेल. जर कुटुंबातील एखाद्या सदस्याची ई-केवायसी केली नाही, तर त्याचे नाव रेशन कार्डमधून वगळले जाईल. त्यामुळे, सरकारी योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्यांची ई-केवायसी वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.
तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईल फोनवरून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. यासाठी खालील सोप्या पायऱ्या वापरा:
सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये ‘Mera Ration’ आणि ‘Aadhaar FaceRD’ हे सरकारी ॲप्स इन्स्टॉल करा.
ॲप उघडल्यानंतर आवश्यक माहिती आणि लोकेशनची परवानगी द्या.
तुमचा आधार क्रमांक, कॅप्चा कोड टाका आणि मोबाईलवर आलेला ओटीपी (OTP) भरा.
यानंतर तुमच्या आधारशी संबंधित माहिती स्क्रीनवर दिसेल.
आता ‘Face e-KYC’ हा पर्याय निवडा.
तुमच्या मोबाईलचा कॅमेरा सुरू होईल. तुमचा स्पष्ट फोटो काढा आणि ‘सबमिट’ बटणावर क्लिक करा.
अशा प्रकारे तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण होईल.
कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी केवायसी बंधनकारक आहे.