बेळगाव : प्रतिनिधी
रेशनकार्ड अपडेट करण्याचा सल्ला रेशनदुकानदार देत आहेत. अन्न व नागरी पुरवठा खात्याकडून देखील सूचना करण्यात येत आहे. मात्र, आधारकार्डवर कन्नडचा उल्लेख नसेल तर ते आधारकार्ड अपडेट करण्याचा सल्ला सॉफ्टवेअर देत आहे. त्यामुळे यापूर्वी देण्यात आलेली हिंदीतील आधारकार्ड कन्नड भाषेत करुन घ्यावी लागत आहेत.
सुरुवातीला देण्यात आलेली हिंदीतील आधार कार्ड आता कर्नाटकात सवलतींसाठी पात्र ठरत नाहीत. बीपीएल रेशनकार्ड धारकाला अनेक सवलती आहेत. मात्र, त्यासाठी आधारकार्ड कन्नडमध्ये हवे. त्यासाठी आधारकार्ड पुन्हा अपडेट करुन ती कन्नड भाषेत करावी लागत आहेत. प्रशासनाने रेशनकार्डवर नावे असलेल्या सदस्यांची आधारकार्ड जमा करण्याची मोहीम सुरु केली आहे. ती जबाबदारी रेशनकार्ड दुकानदारावर टाकली आहे.
रेशनकार्ड अपडेट करण्याचे काम ऑनलाईनच्या माध्यमातून सुरु आहे. आधारकार्डची लिंक दिल्यानंतर आधारकार्डवर असलेल्या मोबाईलवर ओटीपी नंबर नमूद करावा लागत आहे. त्यामुळे मोबाईल नंबर देखील सुरु असणे गरजेचे आहे. आधारकार्डवर जन्म तारखेचा संपुर्ण उल्लेख असायला हवा. त्यासाठी सुद्धा अपडेटचा सल्ला देण्यात येत आहे. रेशनकार्ड दुकानात संपूर्ण जन्मतारखेची नोंद घेण्यात
येत आहे.
नागरिकांची डोकेदुखी
आधारकार्ड हिंदीतून कन्नड भाषेत केल्याशिवाय सवलती मिळणे बंद झाले आहे. त्यामुळे आधारकार्ड कन्नड भाषेत करुन घ्यावी लागत आहेत. नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर, जन्मतारीख याचा अचूक उल्लेख हवा. तरच सॉफ्टवेअर स्वीकारत आहे. त्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे.