

Licenses of six ration shops cancelled
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा पुरवठा विभागाने जिल्ह्यातील सहा रेशन दुकानदारांचे परवाने रद्द केले आहेत. रेशनच्या धान्य वितरणातील अनियमितता, लाभार्थीना हक्काचे धान्य देण्यात होणारी टाळाटाळ, दुकान सतत बंद ठेवून ग्राहकांना वेठीस धरणे अशा तक्रारींवर ही कारवाई करत, दुकानदारांना दणका दिला आहे. याशिवाय ई-केवायसी नोंदणीत हलगर्जीपणा करणाऱ्या सुमारे ७३ रेशन दुकानदारांना पुरवठा विभागाने दंड ठोठावत कारवाईचा बडगा उगारला आहे.
या कारवाईने रेशन दुकानदारांचे धाबे दणाणले आहे. दुकानदारांच्या कारभाराबाबत सतत तक्रारी होतात. जिल्हा पुरवठा विभागातर्फे जानेवारी ते मे या कालावधीत रेशन दुकानांची नियमित तपासणी झाली. यामध्ये एक हजार ३९० दुकानांना अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या पाहणीत ८३ दुकानांच्या कारभारात अनियमितता आढळून आली होती. दुकानांमध्ये फलक नसणे, नियमांचे पालन करण्याची जबाबदारी रेशन दुकानदारांची आहे. धान्याचे रजिस्टर अपडेट न ठेवणे, लाभार्थ्यांना वेळेत धान्य न मिळणे, दुकान बंद असणे यासारख्या बाबी निदर्शनास आल्या.
सूचना करूनही संबंधित दुकानदारांकडून ई-केवायसी नोंदणी केली नाही. त्यामुळे पुरवठा विभागाने कारवाई केली आहे. निफाड १५, धान्य वितरण अधिकारी नाशिक १३, नाशिक ११, नांदगाव ८, चांदवड ७, दिंडोरी ५, मालेगाव ४, बागलाण ४, कळवण ३, इगतपुरी ३ या दुकानांवर दंडात्मक कारवाई केली आहे.नियमांचे पालन करण्याची जबाबदारी रेशन दुकानदारांची आहे. दुकानांची नियमित तपासणी सुरूच राहणार असून, दोषी दुकानदारांवर परवाना रद्दची कारवाई केली जाऊ शकते.