Rahul Gandhi Student Protest : विद्यार्थ्यांवरील कारवाईत पॅलेट गन-खिळे ठोकलेल्या लाठ्या-इलेक्ट्रिक बॅटन्सचा वापर, राहुल गांधींचा दावा

‘चुकीच्या गोष्टींसाठी माफी मागणार नाही’
Rahul Gandhi Student Protest : विद्यार्थ्यांवरील कारवाईत पॅलेट गन-खिळे ठोकलेल्या लाठ्या-इलेक्ट्रिक बॅटन्सचा वापर, राहुल गांधींचा दावा
Published on
Updated on

नवी दिल्ली : दिल्लीतील रस्त्यांवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिस आणि ‘आरएएफ’ने लाठीमार करण्यासोबतच पॅलेट गन, खिळे ठोकलेल्या लाठ्या आणि इलेक्ट्रिक बॅटन्सचा वापर केल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला. या दोन्ही दलांचे नियंत्रण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेच असून, विद्यार्थ्यांवरील कारवाईला शहा हेच जबाबदार असल्याचे गांधी यांनी ठणकावून सांगितले. शहा हे पदावर राहण्यास अयोग्य असून, त्यांनी तत्काळ आपल्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी आक्रमक मागणीही राहुल गांधींनी केली.

बुधवारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, अमित शहा यांच्यावर आरोप केल्यामुळे मी कधीच माफी मागणार नाही. मला संसदेत माझी भूमिका मांडण्यापासून रोखण्यात आले, असा माझा जाहीर आरोप आहे. विद्यार्थ्यांना केवळ मारहाण करण्यात आली असे नाही, तर त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.

‘त्या’ विद्यार्थ्याची दृष्टी जाण्याचा धोका

मी स्वतः एका पीडित विद्यार्थ्याची भेट घेतल्याचे सांगताना ते म्हणाले की, त्या विद्यार्थ्याच्या अंगात आणि डोळ्यात पॅलेट गनचे छर्रे घुसले असून, त्याची दृष्टी जाण्याची भीती निर्माण झाली आहे. एम्स रुग्णालयाच्या वैद्यकीय अहवालातही पॅलेट गनच्या जखमा असल्याचा उल्लेख असल्याचे त्यांनी पुराव्यासह निदर्शनास आणून दिले. संसद भवनात हा अत्यंत महत्त्वाचा विषय उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संसदेत मला बोलू दिले गेले नाही आणि मायक्रोफोन बंद करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

स्वतःच्या मंत्रालयाबद्दल गृहमंत्रीच अनभिज्ञ

गृह मंत्रालयाच्या भूमिकेवर राहुल गांधी म्हणाले की, या हिंसाचाराचे दोनच अर्थ निघतात; एक तर गृहमंत्र्यांनी स्वतः विद्यार्थ्यांना मारहाण आणि पॅलेट गन चालवण्याचे आदेश दिले किंवा त्यांच्या मंत्रालयात काय चालले आहे याची त्यांना कल्पनाच नाही.

पत्राची साधी पोचही मिळाली नाही

मी २५ जुलै रोजी केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट पत्र पाठवले होते. त्या पत्रात विद्यार्थ्यांवर पॅलेट गन वापरण्याची परवानगी कोणी दिली आणि साध्या कपड्यात विद्यार्थ्यांना मारहाण करणारे लोक नेमके कोण होते, असे थेट प्रश्न विचारले होते. तथापि, इतके दिवस उलटूनही केंद्र सरकार किंवा केंद्रीय गृह मंत्रालयाकडून त्या पत्राची साधी पोचही मिळाली नसल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news