

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्रप्रणालीची पहिली उड्डाण चाचणी यशस्वीपणे पार पाडली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि उद्योग जगताचे याबद्दल अभिनंदन केले आहे. 'डीआरडीओ'ने २३ ऑगस्ट रोजी सुमारे १२:३० वाजता ओडिशाच्या किनाऱ्यावर एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्रप्रणाली (IADWS) ची पहिली उड्डाण चाचणी केली.
उड्डाण चाचण्यांदरम्यान, दोन अतिवेगवान फिक्स्ड-विंग मानवरहित हवाई वाहने (UAV) आणि एक मल्टी-कॉप्टर ड्रोन अशा तीन वेगवेगळ्या लक्ष्यांना QRSAM, VSHORADS आणि हाय एनर्जी लेझर वेपन सिस्टीमद्वारे वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि उंचीवर एकाच वेळी लक्ष्य करून पूर्णपणे नष्ट करण्यात आले. क्षेपणास्त्र प्रणाली, ड्रोन शोध व नष्ट प्रणाली, शस्त्र प्रणाली कमांड अँड कंट्रोल, तसेच कम्युनिकेशन आणि रडार यांसह सर्व शस्त्र प्रणालीच्या घटकांनी अचूकपणे काम केले.
एकात्मिक हवाई संरक्षण शस्त्रप्रणाली अर्थात IADWSही एक बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली आहे. यामध्ये तत्काळ जमिनीवरुन हवेत मारा करणारी स्वदेशी क्षेपणास्त्रे (QRSAM),अतिशय कमी पल्ल्याची प्रगत हवाई संरक्षण प्रणाली (VSHORADS) क्षेपणास्त्रे,उच्च शक्तीचे लेझर-आधारित निर्देशित ऊर्जा शस्त्र (DEW) आदींचा समावेश आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ओडिशाच्या किनाऱ्यावर झालेल्या IADWS च्या पहिल्या यशस्वी उड्डाण चाचणीबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर लिहिले की, 'IADWS ही एक बहुस्तरीय हवाई संरक्षण प्रणाली आहे, ज्यामध्ये त्वरित प्रतिसाद देणारी जमिनीवरून हवेत मारा करणारी स्वदेशी क्षेपणास्त्रे (QRSAM), अतिशय कमी पल्ल्याची प्रगत हवाई संरक्षण प्रणाली (VSHORADS) क्षेपणास्त्रे आणि उच्च शक्तीचे लेझर-आधारित निर्देशित ऊर्जा शस्त्र (DEW) यांचा समावेश आहे.'
'मी IADWS च्या अद्वितीय उड्डाण चाचणीने आपल्या देशाची बहुस्तरीय हवाई संरक्षण क्षमता सिद्ध केली आहे. हे शत्रूच्या हवाई धोक्यांपासून महत्त्वपूर्ण ठिकाणांचे संरक्षण करण्यासाठी प्रादेशिक संरक्षण अधिक मजबूत करेल, असा विश्वासही राजनाथ सिंहांनी व्यक्त केला आहे.