
DRDO Pune working on Humanoid Robot for Army
पुणे : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (DRDO) पुण्यातील प्रयोगशाळेत संशोधक एक प्रगत ह्युमनॉइड रोबोट विकसित करत आहेत. हा रोबोट युद्धप्रसंगी थेट सीमेवरील सैनिकी फ्रंटलाइन मोहिमांमध्ये सहभागी होऊ शकेल.
धोकादायक आणि कठीण परिस्थितीत सैनिकांचा थेट सहभाग कमी करून त्यांच्या सुरक्षिततेची हमी देणे हा या रोबोट सैनिकाच्या निर्मितीमागचा उद्देश आहे. यामुळे सैन्यदलाला मदतच मिळणार असून जवानांचेही रक्षण होणार आहे. पीटीआयने याबाबतचे वृत्त दिले आहे.
DRDO च्या अंतर्गत येणाऱ्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंट (इंजिनिअर्स) या महत्त्वाच्या प्रयोगशाळेमार्फत हा प्रकल्प राबवला जात आहे.
हा रोबोट अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असून जंगलांसारख्या उबदार आणि खडतर भूप्रदेशांमध्येही कार्यक्षम राहील, अशी माहिती या संस्थेतील ग्रुप डायरेक्टर, सेंटर फॉर सिस्टिम्स अँड टेक्नोलॉजीज फॉर अॅडव्हान्स्ड रोबोटिक्सचे ग्रुप डायरेक्टर एस. ई. टाळोले यांनी PTI शी बोलताना दिली.
टाळोले म्हणाले, “गेल्या चार वर्षांपासून आमचा संशोधन गट या रोबोटवर काम करत आहे. आम्ही त्याच्या वरच्या आणि खालच्या शरीराचे स्वतंत्र प्रोटोटाईप तयार केले असून, आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये काही महत्त्वाच्या कार्यक्षमतेत यश मिळवले आहे.”
या रोबोटचे सादरीकरण नुकतेच पुण्यातील 'नॅशनल वर्कशॉप ऑन अॅडव्हान्स्ड लेग्ड रोबोटिक्स' मध्ये करण्यात आले होते. सध्या हा प्रकल्प प्रगत टप्प्यात असून, रोबोटला मानवी आदेश समजून घेणे आणि अंमलात आणणे यात अधिक अचूकता यावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
रोबो स्वतंत्रपणे वस्तू पकडणे, ढकलणे, ओढणे, दरवाजे उघडणे, व्हॉल्व्ह फिरवणे, अडथळे पार करणे अशा गुंतागुंतीच्या क्रिया करू शकेल.
दोन्ही हात समन्वयाने स्फोटके, खतरनाक द्रव्ये किंवा मायनसारखी धोकादायक सामग्री हाताळू शकतील.
रोबोट दिवस-रात्र, कोणत्याही परिसरात अखंड कार्यक्षम राहील.
या रोबोमध्ये प्रोप्रिओसेप्टिव्ह आणि एक्स्टेरोसेप्टिव्ह सेन्सर्स बसवलेले आहेत.
डेटा फ्युजन क्षमता, टॅक्टिकल सेन्सिंग, ऑडिओ-व्हिज्युअल परसेप्शनचे उत्तम ज्ञान या रोबोटला असेल.
फॉल आणि पुश रिकव्हरी सिस्टिम याच्यामध्ये आहे.
SLAM (Simultaneous Localisation and Mapping) द्वारे नकाशे तयार करणे, अॅटोनॉमस नेव्हिगेशन, पथ नियोजन इ. कामेही हा रोबोट करू शकेल.
डिझाईन टीमचे प्रमुख शास्त्रज्ञ किरण अकेला यांनी सांगितले की, संतुलन राखणे, वेगाने डेटा प्रक्रिया करणे आणि गाऊंड पातळीवर अचूक कार्य करणे ही सर्वात मोठी आव्हाने आहेत. हा प्रकल्प 2027 पर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट आहे.
या ह्युमनॉइड रोबोचा कारभार तीन प्रमुख घटकांवर आधारित आहे-
ऍक्ट्युएटर्स: जे मानवी स्नायूंप्रमाणे हालचाल निर्माण करतात
सेन्सर्स: जे आजूबाजूच्या परिसराची माहिती गोळा करतात
कंट्रोल सिस्टीम्स: जी ही माहिती समजून योग्य कृती घडवून आणतात
सुरूंग निकामी करणे, बॉम्ब निकामी करण्याचे काम या रोबोटकडून करता येऊ शकते.
DRDO च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दोन आणि चार पायांचे रोबोट्स केवळ संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रातच नव्हे, तर आरोग्यसेवा, गृह सहाय्य, अंतराळ संशोधन, उत्पादन क्षेत्र अशा विविध क्षेत्रांमध्येही वापरण्याची क्षमता बाळगतात.
मात्र, हे सर्व स्वायत्त आणि कार्यक्षम रोबोट्स तयार करणे तांत्रिकदृष्ट्या मोठे आव्हान आहे. अत्यंत हाय रिस्क असलेल्या परिस्थितीत हा रोबोट लष्करासाठी अत्यंत उपयोगी ठरू शकतो.