

UAV Launched Missile
कर्नूल (आंध्र प्रदेश) : भारताने आपल्या संरक्षण तंत्रज्ञानात आणखी एक मोठा टप्पा गाठला असून, ड्रोनमधून क्षेपणास्त्र यशस्वीपणे लाँच करण्याच्या प्रयोगात यश मिळवले आहे. आंध्र प्रदेशमधील कर्नूल येथील नॅशनल ओपन एरिया रेंज (NOAR) मध्ये ही चाचणी करण्यात आली, ती यशस्वी झाली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ने UAV लाँच्ड प्रिसिजन गाईडेड मिसाइल (ULPGM)-V3 च्या यशस्वी चाचणीची माहिती दिली आहे.
या यशस्वी चाचणीबद्दल भारताच्या संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी सोशल मीडियावरून DRDO आणि संबंधित उद्योग भागीदारांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी या यशाला “भारताच्या क्षेपणास्त्र क्षमतांना मोठा चालना” म्हणून वर्णन केले.
ते म्हणाले, "DRDO ने UAV लाँच्ड प्रिसिजन गाइडेड मिसाइल (ULPGM)-V3 ची यशस्वी चाचणी राष्ट्रीय ओपन एरिया रेंज, कर्नूल येथे केली आहे. या यशामुळे भारतीय उद्योग आता महत्त्वाच्या संरक्षण तंत्रज्ञानाचे उत्पादन करण्यास तयार असल्याचे सिद्ध झाले आहे. DcPPs, MSMEs आणि स्टार्ट-अप्सच्या सहभागाने हे शक्य झाले आहे."
DRDO च्या टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरीने (TBRL) विकसित केलेल्या ULPGM-V2 नंतर ULPGM-V3 या नवीन वर्जनमध्ये अनेक तंत्रज्ञानात्मक सुधारणा करण्यात आल्या आहेत. यात मुख्यत्वे खालील वैशिष्ट्ये आहेत:
इमेजिंग इन्फ्रारेड (IIR) सीकर: हे क्षेपणास्त्र अचूक लक्ष्यावर हल्ला करण्यास सक्षम आहे.
ड्युअल-थ्रस्ट प्रोपल्शन सिस्टीम: यामुळे मिसाइलची रेंज आणि गती दोन्ही सुधारल्या आहेत.
हवेतून सोप्या प्रकारे लाँच होणारी: विविध प्रकारच्या ड्रोन आणि हवाई यंत्रांवर सहज बसवता येते.
हे क्षेपणास्त्र हलके असून, अचूकता आणि लवचिकता यांवर भर देऊन तयार करण्यात आले आहे, ज्यामुळे हे विविध युद्धपरिस्थितींमध्ये प्रभावी ठरू शकते.
NOAR हे कर्नूल येथील चाचणी केंद्र DRDOच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी वापरले जाते. नुकतेच येथे उच्च-ऊर्जा लेझर आधारित डायरेक्ट एनर्जी वेपन्स (DEWs) च्या यशस्वी चाचण्या झाल्या होत्या, ज्या फिक्स्ड-विंग UAVs आणि स्वार्म ड्रोनवर प्रभावी ठरल्या आहेत.
डीआरडीओ च्या ULPGM-V3 च्या यशस्वी चाचणीमुळे भारताचा संरक्षण उद्योग प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करून त्याचे उत्पादन करू शकतो, हे दाखवले आहे. यामुळे भारताला स्वदेशी संरक्षण उत्पादनात अधिक आत्मनिर्भरता प्राप्त होईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपली ओळख अधिक बळकट होईल.