

Stary Dog Protecting Newborn:
भटक्या श्वानांबाबत सध्या देशात दोन मतप्रवाह निर्माण झाले आहेत. भटक्या श्वानांचे लहान मुलांवर होणारे हल्ले वाढले आहेत. त्यामुळं सर्वोच्च न्यायालयानं देखील याच्यावर कडक भूमिका घेत प्रशासनाला भटक्या श्वानांचा बंदोबस्त करण्याचे निर्देश दिले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालमधील नबाद्वीपमध्ये एक अजब प्रकार घडला.
नबाद्वीप येथील स्वरूपनगरमधील रल्वे कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका महिलेला पहाटे लहान बाळ रडत असल्याचा आवाज आला. ती महिला आवाजाच्या दिशेने एका घराबाहेर असलेल्या शौचालयासमोर पोहचली. त्यावेळी तिथं एक नवजात बाळ रडत होतं. तिनं त्या बाळाला वाचवलं. मात्र यावेळी एक अजब प्रकार पहायला मिळाला. या मुलाचे संरक्षण भटके श्वान करत होते. त्यांनी जोपर्यंत या महिलेनं या बाळाला वाचवलं नाही तोपर्यंत त्या बाळाचं संरक्षण केलं.
बाळाला वाचवणाऱ्या महिलचं नाव राधा भौमिक असं आहे. तिला हे नवजात बाळ शौचालयाच्या बाहेर आढळून आलं. त्यावेळी त्याच्या भोवती भटके श्वान जमा झाले होते. राधा यांनी त्वरित या मुलाला उचललं अन् मदतीसाठी आवाज दिला. त्यानंतर राधा यांचे नातेवाईक पृथ्वी भौमिक धावत आला. त्यानंतर तो बाळाला रूग्णालयात घेऊन गेला. यानंतर हे नवजात बाळ कृष्णानगर सदर रूग्णालयात हलवण्यात आलं.
डॉक्टरांनी सांगितलं की या नवजात बाळाला कोणतीही बाह्य इजा झालेली नाही. या मुलाच्या डोक्याला रक्त लागलं होतं. हे रक्त त्याच्या जन्मावेळी लागलं असलण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली.
नबाद्वीप पोलिसांना स्थानिक व्यक्तीने प्रसुतीनंतर लगेचच हे बाळ फेकून दिल्याचा संशय व्यक्त केला. याबाबत पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. त्यांनी मुलाची काळजी घेण्यासाठी बाल कल्याण समितीकडे देखील याची माहिती दिली आहे.
दरम्यान भौमिक यांनी, 'ज्या श्वानांच्या पाठीमागं आपण लागलो आहोत त्यांनी अनेक माणसं जे करणार नाहीत ते केलं आहे. त्या श्वानांनी त्या बाळाला जीवंत ठेवलं.'
विशेष म्हणजे अशाच प्रकारची घटना कोलकाता इथं ९ वर्षापूर्वी घडली होती. त्यावेळी देखील चार भटक्या श्वानांनी नवजात मुलीजवळ बसून कावळ्यांना हुसकवून लावलं होतं. हे श्वान त्या मुलीची सुटका होत नाही तोपर्यंत तिथं बसून होते.