

मालेगाव : शहरातील लबैक हॉटेल परिसरात घरासमोर अंगणात खेळणारा अडीच वर्षीय चिमुकला श्वानांच्या हल्ल्यात ठार झाला आहे. मोहम्मद शहबाज शेख सलीम असे बालकाचे नाव आहे.
शुक्रवारी (दि. 28) सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. मुलगा अंगणात खेळताना श्वानांनी त्याच्यावर अचानक हल्ला चढविला. कुटुंबियांनी अत्यवस्थ स्थितीत त्याला येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. गंभीर परिस्थिती पाहून या बालकाला तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना बालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शहरातील विविध चौक व रस्त्यांवर मोकाट श्वाद व जनावरांचा सुळसुळाट झाला आहे. नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे मनपा प्रशासन थातूरमातूर कारवाई करते. नंतर पुन्हा जैसे थे परिस्थिती होते.
शहरात 2019 ते 2025 या दरम्यान 32 हजार 33 जणांना श्वानदंश झाला आहे. राज्यातील कुठल्याही शहरापेक्षा हे प्रमाण भयावह आहे. प्रशासनाने मोकाट श्वानांचा तातडीने बंदोबस्त न केल्यास शहरातील विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोकाट श्वान पकडून महापालिकेत आणून सोडतील, असा इशारा रुग्णसेवा समितीचे सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते शफीक शेख यांनी दिला आहे.